छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेत अरुंधती हे पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत आहे. या मालिकेद्वारे ती पुन्हा प्रसिद्धीझोतात आली. मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड’ यां संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. तिने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. आता तिने याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ‘मिरॅकल्स अकॅडमी’चे संचालक पद सोडण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने यावर सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : “आमचा साडेतीन वर्षांचा संसार…” दोनदा घटस्फोट झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणाऱ्या नेहा पेंडसेचे वक्तव्य, म्हणाली “लग्नानंतर स्त्रियांनाच…”
“मी आणि प्रमोदने २००२ मध्ये मिरॅकल्स अकॅडमी सुरु केली. पण माझ्या असं लक्षात आलं की मला त्यात अजिबातच वेळ देता येत नाही. कारण अकॅडमी हा माझ्या अवाक्याचा भाग नाही. ते माझं स्वप्न कधीच नव्हतं. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरु झाल्यानंतर त्यात काय सुरु आहे, त्याच्या शाखा कुठे आहेत, कोण शिकवतंय, याचा काहीच गंध नव्हता. कारण मालिकेच्या शूटींगमध्येच जवळपास १३ तास जातात. त्यानंतर मग उरलेला वेळ हा मुलीसाठी देते”, असे तिने सांगितले.
“यानंतर मग मी शांतपणे ठरवले की जर मी त्यासाठी वेळच देत नाही. तर मी संचालिकापद मिरवण्यात काहीच अर्थ नाही. यानंतर मग मी प्रमोदला तू ही अकॅडमी पूर्णपणे सांभाळ, असे सांगितले. तसेही ती अकॅडमी तोच सांभाळत होता. त्यामुळे मग माझं नाव आणि पदाचं मी काय करु, असा प्रश्न मला पडला होता.
खूप चांगले कलाकार या अॅकेडमीने घडवलेत. प्रमोदने खूप चांगलं काम केलं. त्याने या माध्यमातून सिनेसृष्टीला चांगले कलाकार दिले. मी जोपर्यंत त्या अॅकेडमीमध्ये सक्रीय होते, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सक्रीय होते. पण आता मला वेळच देता येत नाही तर मग वेगळं झालेलं बरं”, असे मधुराणी प्रभुलकरने म्हटले.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
दरम्यान ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड’ ही संस्था ती आणि तिचे पती प्रमोद प्रभुलकर यांनी एकत्र सुरु केली होती. ते दोघेही एकत्र ही अभिनयाची अकॅडमी चालवत होते. या अकॅडमीत आतापर्यंत अनेक कलाकारांनी प्रशिक्षण घेतले आहे. ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर या कलाकारांनी याच अकॅडमीत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.