‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. ती कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच मधुराणीने एका मुलाखतीत पुरुष आणि लग्नसंस्था या विषयाबद्दल स्पष्ट मत मांडलं.
नुकतंच एका युट्यूब चॅनलला मधुराणी प्रभुलकरने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला “बाई बाईपण खूप होतं, यामध्ये पुरुष दबला जातोय, असं वाटतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मधुराणीने “मग चांगलं आहे, पुरुष दबला राहू दे की काय हरकत आहे. कायम स्त्रियांनीच दबून राहायचं का?” असे म्हटले.
आणखी वाचा : “…तर मग वेगळं झालेलं बरं” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचं वक्तव्य चर्चेत
“पुरुषांनी आता दबलंच पाहिजे. हे आता व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय त्यांना स्त्रियांचं दु:ख कसं कळेल. इतके वर्ष तुमची ओरड बस्स झाली आता. जर तुम्ही आता तुमच्यात बदल केले नाहीत, तर स्त्रिया तुम्हाला फाट्यावर मारणार आहेत. हे आता पुरुषांनी मान्य करायला हवं”, असेही मधुराणीने म्हटले.
“स्त्रिया आता सक्षम होत आहेत. आर्थिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या स्त्री आता सक्षम होत आहे. त्यामुळे आता स्त्री जशी आहे, तसं जर तुम्ही तिला स्वीकारलं नाही आणि तुम्ही स्वत:मध्ये जर बदल केले नाहीत, तर लग्नसंस्था वैगरे मोडकळीला येणार आहे. आता तुम्हाला नवीन पद्धतीने या संस्थेकडे बघायला पाहिजे. तर ती टिकणार आहे आणि टिकली नाही तरी चालेल, मोडू देत. कारण त्यातून नाविन्य निर्माण होणार आहे. लग्नसंस्था कशामुळे मोडतात, याचं विश्लेषण जर आपल्या पिढीने किंवा तुमच्या पिढीने केला आणि त्यांच्या पुढच्या पिढीने केला, तर त्याचे नवीन व्हर्जन येईल.
आता पॉवर गेम चालणार नाही. ती एक सक्षम स्त्री आहे आणि मला माझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी तिला स्वीकारायचं आहे. मी तिला कमी लेखणार, मी तिला कंट्रोल करणार हे असं आता होणार नाही”, असा सल्लाही मधुराणीने यावेळी दिला.
“ती सक्षम आहे आणि स्वत:च्या पायावर उभी आहे. ती एकटी राहू शकते आणि जगूदेखील शकते. आता मला जर तिला पकडून ठेवायचं असेल तर मला तिच्याबरोबर राहून काम करावं लागेल. तिला खाली ठेवून नाही. जर हे बदल पुरुषांनी केले तरच हेल्दी समाज निर्माण होईल”, असेही मधुराणीने यावेळी म्हटले.