‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यामुळे ते अभिनयाबरोबरच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे; जी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मालिकेतील कलाकार आनंदाने नाचताना दिसत आहेत. हाच व्हिडीओ शेअर करत मिलिंद गवळी यांनी छान पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी नुकताच घडलेला चाहत्यांचा एक अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा – टीआरपी शर्यतीत ‘ठरलं तर मग’चं अधिराज्य कायम, ‘या’ मालिकांच्या TRP मध्ये झाली घसरण

मिलिंद गवळी यांनी लिहिल आहे, “आयुष्य सुंदर आहे. आपण भाग्यवान आहोत. आज सकाळी आपण झोपेतून उठू शकलो, ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. कारण जगामध्ये असे लाखो लोक आहेत ज्यांनी आजची सकाळ पाहिली नसेल. खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण आज युक्रेन किंवा गाजा स्ट्रिपमध्ये राहत नाही आहोत. आपण भाग्यवान आहोत की आपण हिटलरच्या काळामध्ये ज्यूस म्हणून जर्मनीमध्ये जन्माला नाही आलो. मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये जन्माला, इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो, मी नाही आलो जन्माला सोमालिया, बुरंडी, सुदाम अशा देशांमध्ये, जिथे कुपोषित मुलांची संख्या अतिशय जास्त आहे.”

“मी भाग्यवान आहे की इतक्या सुंदर आई-वडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. ज्यांनी माझं खूप छान पद्धतीने संगोपन केलं. मला चांगलं शिक्षण दिलं. स्वतः कष्ट करून माझा आयुष्य सुखमय करायचा प्रयत्न केला. आयुष्याकडे बघायचा सकारात्मक आणि छान पद्धतीचा दृष्टिकोन त्यांनी मला दिला. मी भाग्यवान आहे की मला माझ्या आवडीचं काम मिळालं आणि त्या कामांमध्ये मला यशही मिळालं. मी भाग्यवान आहे की मला सुदृढ शरीर आणि जिद्दी मन मिळालं. आजही कष्ट करायची ताकत दिली.”

हेही वाचा – Video: ‘या’ कारणासाठी अधिपती उचलणार मास्तरीण बाईवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये होणार आजवरचा सर्वात मोठा खुलासा

“कृतज्ञ, आज बाराशे हून अधिक भाग ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे मला मिळाले आणि अजून ही छान पद्धतीने करायला मिळता आहेत. उत्कृष्ठ लेखन, दिग्दर्शन, निर्मिती तंत्रज्ञ आणि अफलातून सहकलाकारांबरोबर काम करायला मिळतं आहे. स्टार प्रवाह, हॉट स्टार सारखी उत्कृष्ट वाहिनी या वर ते प्रदर्शित होत आहे. या चार वर्षांमध्ये अनिरुद्ध देशमुख या माझ्या भूमिकेसाठी लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं आहे. खरंच भाग्यवान आहे मी. काल मी माझ्या वडिलांबरोबर एका ठिकाणी गेलो असताना काही लोक धावत माझ्याजवळ आले माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी, त्यानंतर माझे वडील मला म्हणाले, “माझ्यासारखा पोलीस खात्यात आला असतास आणि डीसीपी म्हणून किंवा कमिशनर म्हणून जरी रिटायर झाला असतास, तरी इतकी लोकप्रियता, प्रसिद्धी आणि लोकांचं इतकं प्रेम मिळालं नसतं.” मी भाग्यवान आहे की मला माझ्या वडिलांकडनं ही अशी पावती मिळाली,” असं मिलिंद गवळी यांनी सांगितलं.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेतही झळकले आहेत. तसेच मिलिंद यांनी मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali share fan moment pps