‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अलीकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. यामधल्या प्रत्येक पात्राची घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मालिकेत अरुंधती, अनिरुद्ध, यश, अनघा, अप्पा, ईशा, संजना, अभिषेक या भूमिका साकारणारे कलाकार सुद्धा प्रसिद्धीझोतात आले होते.

अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यावर आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री घेतली आहे. नुकतेच ते एका कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर दौऱ्यावर गेले होते. यानिमित्ताने आलेला एक अनुभव मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मिलिंद गवळी एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजीनगर याठिकाणी जात होते. यावेळी विमानतळाचं नाव अजूनही बदललेलं नाहीये, “एअरपोर्टचं नाव अजून का बदललेलं नसावं?” याबाबत त्यांनी व्हिडीओ शेअर करत सवाल उपस्थित केले आहेत.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

आज स्टार प्रवाहच्या एका कार्यक्रमासाठी पहाटेची फ्लाइट पकडून संभाजीनगरला पोहोचलो, आज संध्याकाळी संभाजीनगर मध्ये इव्हेंट आहे आणि यासाठी मला आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी मी आणि ‘स्टार प्रवाह’चे हितेश आढाव याठिकाणी आलेलो आहोत. हा खूपच हॅपनिंग इव्हेंट असतो. खूप धमाल मस्ती असते. ‘स्टार प्रवाह’वरच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधल्या ‘अनिरुद्ध देशमुख’ विषयी बायकांना खूपच कुतूहल असायचं, अशा इव्हेंटला ते पाहायला मिळायचं. ‘अनिरुद्ध देशमुख’ म्हणून मी स्टेजवर आल्यानंतर वेगळंच वातावरण असायचं, आज संभाजीनगरमध्ये पार पडणाऱ्या कार्यक्रमांमध्ये फक्त ‘अनिरुद्ध देशमुख’ म्हणून नाहीतर, मी ‘यशवंतराव भोसले’ माजी समाज कल्याण मंत्री म्हणून सुद्धा असणार आहे, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेमध्ये नुकतीच माझी एन्ट्री झालेली आहे. प्रेक्षकांमध्ये त्याचंही कुतूहल असेलच.

आज सकाळी इंडिगो फ्लाईटने येत असताना, मला एक प्रश्न पडलेला आहे. फ्लाइट्सचे कॅप्टन म्हणाले आपण औरंगाबादला पोहोचतो आहोत, एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथे औरंगाबाद एअरपोर्ट असं नाव लिहिलेलं आहे.

जर आपण औरंगाबादचं नाव बदललं आहे असं म्हणतो, हे नाव छत्रपती संभाजी नगर केलेलं आहे मग, एअरपोर्टचं नाव अजून का बदललेलं नसावं?
Airport Authority Of India ला हे लागू पडत नाही का? जसं मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज Terminus हे नाव दिलेलं आहे, तसंच इथे पण छत्रपती संभाजी महाराज Airport असं नाव असायला हवं होतं, झालं असतं तर छान वाटलं असतं.

गूगलवरची माहिती
२४ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्याने देखील सहमती दर्शवली आहे. “बऱ्याच ठिकाणी औरंगाबाद हेच नाव आहे अजून… हे चुकीचं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं स्वागत आहे सर… ” असं या युजरने कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

Story img Loader