छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे चॅनेल्समध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या महिन्यात विविध चॅनेल्सवर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला. स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या वाहिनीवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ अशा दोन मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यापैकी ‘साधी माणसं’ ही मालिका सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते, तर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेला साडेसातचा स्लॉट देण्यात आला आहे.
नव्या मालिकेसाठी छोट्या पडद्यावर ४ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेची सायंकाळची वेळ बदलून ती दुपारी अडीच वाजताची करण्यात आली. तसेच अरुंधतीच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सध्या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेची वेळ बदलली म्हणून प्रेक्षकवर्ग कमी होईल का? अचानक बदल का केला? असे बरेच प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित करण्यात येत होते. यावर आता मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
‘आई कुठे काय करते’
आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता.
जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनेल लागलेलं असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की, आमच्याकडे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनेल लावत नाही, आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बघितली जायची.आता १८ मार्चपासून निर्णय घेण्यात आला की, आमची ही मालिका संध्याकाळी साडेसातच्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल, संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की “आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का!” मला ऐकून छान वाटलं आणि माझ्या असंही ऐकण्यात आलं आहे की, दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे. मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये, संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टारवर असो बघणारे हे आवडीने बघतातच.
मला खरंच स्टार प्रवाहचं, राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, creative team चं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायची consistency, creative thinking, persistency, बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते.
आणि माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट, ही इतक्या लवकर कशी संपू शकेल, जसं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये interesting, unpredictable, आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारं घडत असतं, आजही काम करताना मला तेवढीच मजा येते आहे. बरं इथे बाहेर अतिशय ऊन वाढलेलं आहे, ३७/३८ डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, अडीच वाजता स्टार प्रवाह वर “आई कुठे काय करते” बघा.
हेही वाचा : ना गुलाबी रंगाचा ड्रेस, ना साडी; बायको मंजिरीचा डान्स पाहून प्रसाद ओक म्हणतो…; मजेशीर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका डिसेंबर २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये मिलिंद गवळींसह अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, रुपाली भोसले या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.