‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला दरवर्षी वाहिनीवर नव्याने एन्ट्री घेणारे कलाकार याशिवाय, यापूर्वीच्या मालिकांमध्ये झळकलेले कलाकार सुद्धा आवर्जून उपस्थित राहतात. ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांनी गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सगळे कलाकार यंदा या सोहळ्याला उपस्थित होते. गौरी, जयदीप, शालिनी, अरुंधती, रुपाली, अनिरुद्ध ही सगळी पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी यंदा या सोहळ्यात काहीशा हटके लूकमध्ये उपस्थित राहिले होते. त्यांचा लूक नेमका कोणी डिझाईन केला होता, यामागची गोष्ट काय आहे? याबद्दल अभिनेत्याने सविस्तर पोस्ट लिहित माहिती दिली आहे.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार २०२५ जो १६ मार्च संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या सोहळ्याला हजर राहण्यासाठी काय कपडे घालावेत हा एक मोठा प्रश्न पडला होता, शेवटच्या क्षणापर्यंत माझं ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचं शूटिंग चाललं होतं, या वेळेला कुठलाही डिझायनर डोळ्यासमोर नव्हता, गेली पाच वर्ष डिझायनरने बनवलेले कपडे घालत होतो आणि बऱ्याचदा मला ते आवडायचे नाहीत, तरी आपल्यासाठी त्यांनी बनवले आहेत म्हणून घालावे लागायचे. बरं मग फोटो काढा, रील टाका, त्यांना टॅग करा, हे आलंच, मग या वेळेला म्हटलं आपणच आपला डिझायनर होऊयात… ‘स्टार प्रवाह’च्या भव्यदिव्य इव्हेंटला साजसे कपडे आपणच तयार करूयात. मग, समजलं की, सिल्व्हर आणि पर्ल ही थीम दिलेली आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या शूटिंगला ड्रेसमॅन रंगा जाधव मला फेटा बांधत असे, त्याला म्हटलं स्टार प्रवाह इव्हेंट आहे मला फेटा बांधशील का? तो आनंदाने ‘हो’ म्हणाला. मग दिपाकडून ( पत्नी ) तिची एक ब्लॅक-सिल्व्हर साडी मागून घेतली, त्याचा बनवला फेटा आणि झाला माझा पारंपारिक-वेस्टर्न ड्रेसकोड तयार… आणि मुख्य म्हणजे या वेळेला मी त्या कपड्यांमध्ये Comfortable होतो.
पण, मग असं वाटायला लागलं आपण Overdressed झालो का?
Dress to the Occasion Or Dress which makes You comfortable, Or Wear Simple ? हे असे प्रश्न नेहमीच मला पडत असतात.
या पोशाखावरून एक गोष्ट मनात राहिली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्क्सी यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. त्यावेळेला झेलेन्सकींचा अपमान करण्यात आला होता. त्या दिवशी, झेलेन्स्कीने युद्धकाळातील शैलीच्या अनुरूप एक साधा काळा पोशाख घातला होता.

“तुम्ही या देशाच्या कार्यालयात सर्वोच्च स्तरावर आहात आणि तुम्ही सूट घालण्यास नकार देता,” ब्रायन ग्लेन, मुख्य व्हाईट हाऊस प्रतिनिधी याने विचारलं. झेलेन्स्की म्हणाले, “हे युद्ध संपल्यानंतर मी पोशाख घालेन….कदाचित तुमच्यासारखे काहीतरी, कदाचित काहीतरी चांगले. मला माहित नाही.” जगातल्या मीडियासमोर झेलेन्सकीला अपमानित करून हाकलून दिलं. गेली तीन वर्षे रशियासारख्या बलाढ्य देशाच्या तुलनेत छोटा देश युक्रेन लढतो आहे. त्या युक्रेनच्या नेत्याचा असा अपमान करणं योग्य आहे का? भारत ज्यावेळेला पारतंत्र्यात होता, त्यावेळी आपले स्वातंत्र्य सैनिक, आणि नेत्यांचा पाश्चात्य देशात असाच अपमान झाला असेल का?
पोशाख – दीपा गवळी
फोटो – विशाल भोसले
फेटा – रंगा जाधव

दरम्यान, मिलिंद गवळी यांनी पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या बायकोच्या साडीचा बांधलेला फेटा लक्षवेधी ठरला आहे. त्यांचा पोशाख त्यांच्या पत्नी दीपा गवळी यांनी डिझाईन केला आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.