अभिनेत्री राधा सागर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने ‘अंकिता’ हे पात्र साकारलं होतं. काही महिन्यांपूर्वी गरोदर असल्याने अभिनेत्रीने कलाविश्वातून काही काळ ब्रेक घेतला. या दरम्यान, सोशल मीडियावर गरोदरपणातील विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत होती. अखेर सप्टेंबर महिन्यात राधाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. अलीकडेच राधाने लाडक्या लेकाचं बारसं थाटामाटात साजरं करून त्याचं नवा ‘वीर’ असं ठेवलं. लेकाचं नाव वीर का ठेवलं? याबद्दल राधाने नुकताच इ-टाइम्सशी संवाद साधताना तिने खुलासा केला आहे.
राधा म्हणाली, “माझ्या बाळाचा जन्म झाल्यावर मी प्रचंड आनंदी होते. पण, जन्मानंतर वीरला व्यवस्थित श्वास घेता येत नव्हता. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे एनआयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. जवळपास नऊ ते दहा दिवस तो रुग्णालयात असल्याने आम्हाला प्रचंड काळजी वाटत होती. पहिल्या दिवसापासून माझ्या बाळाने खूप धैर्य दाखवलं म्हणून आम्ही त्याचं नाव ‘वीर’ असं ठेवलं.”
हेही वाचा : सुभेदार ‘असा’ साजरा करणार अर्जुनचा वाढदिवस! सायलीला आठवणार भूतकाळाचा दिवस, पाहा प्रोमो…
वीरचं बारसं अभिनेत्रीने पारंपरिक पद्धतीने साजरं केलं होतं. राधाच्या लाडक्या लेकाच्या बारशाला जवळचे कुटंबीय, तिचे मित्र-मैत्रिणी व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी अभिनेत्रीने पैठणीचा जांभळ्या रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस परिधान केला होता. वीरला सुद्धा अशाच प्रकारचा पारंपरिक ड्रेस घालण्यात आला होता. नामकरण सोहळ्यात आई अन् लेकाच्या ट्विनिंग ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
हेही वाचा : ६५ वर्षीय दर्शन जरीवालांवर महिलेचे गंभीर आरोप; अभिनेत्यासह विवाह केल्याचा अन् गरोदर असल्याचा खुलासा
दरम्यान, राधा सागरच्या लेकाच्या बारशातील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला होता. या काळात तिने करिअरपासून ब्रेक घेतला. आता राधा बाळ वीरला अधिकाधिक वेळ देऊन त्याच्या संगोपनावर भर देणार आहे.