‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत अनेक छोटी पात्र झळकली; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे अरुंधतीची मैत्रीण देविका. अभिनेत्री राधिका देशपांडेने देविका हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. नुकतंच राधिकाने एका मुलाखतीमध्ये स्त्रीने टिकली लावण्याविषयी आपलं परखड मत मांडलं. ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…
‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला अभिनेत्री राधिका देशपांडेने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राधिका म्हणाली, “एकेदिवशी मिरजेला ‘नथुराम गोडसे’ नाटकाचा प्रयोग होता. मग तिथे भिडे काकांची भेट झाली. साहजिकच मला फोटो काढावासा वाटला. मी फोटो काढला आणि तो ठेवला होता. तो मी काही लगेच पोस्ट केला नाही. त्याच दरम्यान टिकलीवर काहीतरी घाव घालण्यात आला. भिडे काकांवर बोललं गेलं की, त्यांनी एका पत्रकार महिलेला सांगितलं की, तू टिकली लावून ये मग मी बोलेन. आता ते कुठल्या दृष्टीकोनातून बोलले मला काहीच माहिती नाहीये. टिकली लावायची का नाही लावायची? कधी लावायची का नाहीच लावायची? याविषयावर प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य असायला हवं. कुंकवाला पर्याय म्हणून आपण टिकली लावायला लागलो.”
हेही वाचा – ५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता ओटीटीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला? जाणून घ्या…
पुढे राधिका देशपांडे म्हणाली, “पण, मला भिडे काका असं बोलले, याचा खूप विचार करावासा वाटला. ते का बोलले असतील? मग खरंच ते बरोबर आहे का? आपण आपली संस्कृती सोडतो आहोत का टिकली लावली नाही तर?…मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी जाण्याचा एक डेकोरम ( Decorum ) असतो प्रोटोकॉल असतो. मला वाटतं टिकली लावायला पाहिजे. न लावून फार असे तुम्ही ग्रेट आहात असं दाखवत असाल तर ते तसं नाहीये. टिकली लावणाऱ्या बायका पण अतिशय सुंदर, आकर्षक असतात.”
हेही वाचा – “प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
संभाजी भिडे यांचं प्रकरण
काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकार मंत्रालयात गेल्या होत्या. त्यावेळी संभाजी भिडे मंत्रालयात आले होते. म्हणून त्या महिला पत्रकाराने संभाजी भिडेंना विचारलं की, तुम्ही कुणाची भेट घेतली? यावर संभाजी भिडे म्हणाले होते, “तू आधी टिकली लाव तर तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री भारतमाता आहे. भारतमाता विधवा नाही, त्यामुळे तू आधी कुंकू किंवा टिकली लाव मग मी तुझ्याशी बोलेन.” संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर गदारोळ झाला होता.