मुंबईत छोटसं का होईना स्वत:चं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी सुरुवातीच्या काळात संघर्ष करून आज यशाचं एवढं मोठं शिखर गाठलं आहे. २०२४ मध्ये अनेक कलाकारांनी नवीन घरं, गाड्या खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली. नुकतंच यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
रुपाली भोसलेने ठाण्यात सुंदर असं घर खरेदी केलं आहे. जवळचे मित्रमंडळी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिने या नवीन घरात दोन दिवसांपूर्वीच गृहप्रवेश केला. अभिनेत्रीच्या घरी यावेळी बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती. तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने रुपालीने आजवर केलेली मेहनत व तिच्या नव्या घराबद्दल ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
गौरी सांगते, “रुपाली माझी मैत्रीण आहे ही गोष्ट आता सर्वांना माहिती आहे. पण, खरं सांगायचं झालं, तर ती माझं कुटुंब आहे. तिने नवीन घर घेतलंय याचा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. खरंतर मला बोलताही येत नाहीये एवढी मी आनंदी आहे.” रुपालीच्या नव्या घराबद्दल सांगताना गौरी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण संघर्षाचा काळ आठवून अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते.
गौरी पुढे म्हणाली, “मी माझ्या कुटुंबीयांपासून दूर राहते. अशा परिस्थितीत रुपालीने मला तिच्या कुटुंबाचा एक भाग करून घेतलं. घर घेतलं ही बातमी तिने मला भेटून सांगितली होती. आम्ही आनंदनगर परिसरात कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी तिने अचानक मला पेढा दिला. तेव्हा ती म्हणाली, मी फायनली घर घेतलं. खरंतर त्याचवेळी तो क्षण आमच्यासाठी खूप जास्त खास होता. तेव्हाही आम्ही रडत होतो. मी तिच्यासाठी खूप जास्त आनंदी आहे आणि मला तिचा खूप जास्त अभिमान वाटतो.”
“अगदी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या मुलीने आज एवढ्या मेहनतीने हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. तिच्या या नव्या घरामुळे मला वाटतंय अरे आपलंच नवीन घर झालंय. आता तिच्यामुळे माझं मुंबईमध्ये एक हक्काचं घर आहे जिथे मला जाता येईल… मला आता बीडला जावं लागणार नाही, मी तिच्याकडे येणार… ही नव्या घराची गोष्ट समजल्यावर आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. फक्त रडत होतो. या घराचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून प्रत्येक गोष्टीचं अपडेट ती मला देत होती. आपण असं करूया, तसं करूया असंच ती नेहमी म्हणायची. खरंतर, माणूस म्हणून रुपाली खूपच भारी आहे. मी तिची मैत्रीण आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे” असं गौरी कुलकर्णीने सांगितलं.