Aai Kuthe Kay Karte Fame Actress Rupali Bhosle : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २०१९ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. अरुंधती या मालिकेची नायिका असली, तरी खलनायिका साकारणार्‍या संजनाला सुद्धा घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुपालीने वैयक्तिक आयुष्यात काही दिवसांपूर्वीच आलिशान गाडी खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. आता अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. रुपालीने आयुष्यात मोठा संघर्ष करून आजच्या घडीला हे एवढं मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची लाडकी रुपाली कायम सर्वांशी आपुलकीने वागते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या चाहत्यांना इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत रुपालीने तिच्या आईने सुरू केलेल्या एका नवीन प्रवासाची माहिती दिली आहे.

रुपालीच्या आईने घरगुती जेवणाच्या ऑर्डर घेण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, भविष्यात क्लाऊड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं हे स्वप्न असल्याचं या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने सांगितलं आहे.

रुपाली म्हणते, “हाय-हॅलो नमस्कार, आजचा बेत आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळ्या… आमच्या कोकणात काळ्या वाटाण्याच्या उसळीला एक वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक सणावाराला, शुभकार्याला ही काळ्या वाटाण्याची उसळ हमखास बनवली जाते. बरं मी आता जेवण करतेय ते सगळं ऑर्डरचं आहे.”

“माझ्या आईने जेवणाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आहे. ही तिची चौथी/पाचवी ऑर्डर आहे. मोदकापासून या प्रवासाला सुरुवात झाली. मग पुरणपोळ्या, फिश, व्हेज बिर्याणी आणि आज काळ्या वाटण्याची उसळ आणि आंबोळ्या… आता मी घरी असल्यामुळे आईला मदत करू शकतेय. आमचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे… एखादं क्लाउड किचन किंवा रेस्टॉरंट सुरू करायचं. बघु आता ते कधी सुरू होतंय…पण, त्याआधी माझ्या आईला या नवीन प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया! होईलचं लवकर सगळं सुरू…” अशी पोस्ट लिहित रुपालीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, रुपालीच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “ऑल द बेस्ट रुपाली”, “अभिनंदन रुपाली”, “मॅम खूप छान लागते ही भाजी” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आता येत आहेत. सर्वांनी या नव्या उपक्रमासाठी रुपालीसह तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame rupali bhosale share good news her mother start home business of food sva 00