अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. संजना ही भूमिका अभिनेत्रीने साकारली होती. नकारात्मक भूमिकेतूनही अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेने काही दिवसांपूर्वी निरोप घेतला तरी मालिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सातत्याने चर्चेत राहतात. अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
तुझ्या आयुष्यात केवळ आनंद…
अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या आईच्या वाढदिवसा निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. रूपालीने आईबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघींनीही सुंदर साडी नेसल्याचे दिसत आहे. पारंपरिक वेशभूषेतील हा फोटो लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करीत रूपालीने आईविषयीच्या तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने “साधी भोळी माझी आई, सुखाची गं तू साऊली” या गाण्याच्या काही ओळी सुरुवातीला लिहिल्या आहेत. पुढे तिने लिहिले, “स्वत:ला विसरून इतरांसाठी सर्व काही करणारी, तू प्रेम दिलेस, सगळ्यांना तू नेहमीच जपलेस, खूप कष्ट सोसले, पण आता येणारा प्रत्येक क्षण, तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू असेच कायम असू दे. माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिच्या जीवावर मी चढल्या, अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मातोश्री”, असे लिहित अभिनेत्रीने पुढे हार्ट इमोजी शेअर केला आहे. रुपाली भोसलेच्या या पोस्टवर अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत; तर काहींनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
अभिनेत्री कायमच अनेकविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोशल मीडियावरसुद्धा ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो. याबरोबरच रूपाली तिच्या आयुष्यातील काही क्षणही चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. तिच्या आनंदात चाहत्यांनादेखील सहभागी करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिने मर्सिडीज खरेदी केली होती, त्यावेळी तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळत होते.
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली असली तरी रुपाली भोसलेने अनेक मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘बडी दूर से आये है’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘वहिनी साहेब’, ‘तेनालीरामा’ अशा अनेक मालिकांत रुपाली भोसले महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.