‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेने अलीकडेच तिच्या नव्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. २९ जूनला मोठ्या थाटामाटात रुपालीच्या नव्या घराची वास्तूशांती पार पडली. जवळच्या नातेवाईकांच्या आणि इंडस्ट्रीतील मोजक्या खास मित्र-मैत्रीणीच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने रुपालीच्या नव्या घराची वास्तुशांती झाली. याचे फोटो, व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. पण अद्याप रुपालीने स्वतः नव्या घराचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. पण इतर कलाकार मंडळी रुपालीच्या नव्या घरातील व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री गौरी कुलकर्णीने रुपाली भोसलेच्या नव्या घरातील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. रुपाली व गौरी दोघी खास मैत्रीणी आहेत. गौरीने हा डान्स व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “रुपालीचं स्वप्न साकार झाल्यामुळे आम्ही आनंद साजरा करत आहे; माझ्या पहिल्या डान्स व्हिडीओबरोबर. रुपाली मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे.”
या व्हिडीओमध्ये, रुपाली व गौरीने ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स केला आहे. सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या गाण्यांचं मॅशअप खूप ट्रेंड होतं आहे. त्याचं ट्रेंडला फॉलो करत रुपाली व गौरी जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये दोघी पेस्टल गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहेत. रुपालीने नऊवारी नेसली असून गौरी सहावारी साडीत पाहायला मिळत आहे.
रुपाली व गौरीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप गोड”, “खूप छान”, “काय भारी दिसताय दोघी”, “सुंदर”, “कडक”, “मस्त”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रुपाली भोसले घराच्या इंटेरिअरवर काम करत होती. घराचा प्रत्येक कानाकोपरा तिनं स्वतःच्या स्टाइलने सजवला आहे. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे रुपाली खूप आनंदात आहे. तिचं संपूर्ण आलिशान घर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.