स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती अहोरात्र मेहनत करत असते. गेल्या काही महिन्यांपासून मराठी कलाकार स्वतःचं हक्काचं घर घेताना दिसत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, अदिती द्रविड, योगिता चव्हाण, अक्षय केळकर अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी मायानगरी मुंबईत स्वतःचं नवं घर घेतलं आहे. आता या यादीत ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील रुपाली भोसलेचंही नाव सामील झालं आहे.
अभिनेत्री रुपाली भोसलेने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. शनिवारी, २९ जूनला तिच्या नव्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. रुपालीच्या नव्या घराच्या वास्तूशांतीचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या नव्या घराबाहेर असलेल्या नेमप्लेटनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या नेमप्लेटमध्ये रुपालीचं नाव नाहीये. यामागचं नेमकं कारण काय? याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.
हेही वाचा – “दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज…”, क्षितिज पटवर्धनने राहुल द्रविडसाठी लिहिलेल्या खास पोस्टने वेधलं लक्ष
‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना रुपाली भोसलेने नेमप्लेटमध्ये नाव नसण्यामागचं कारण सांगितलं. रुपाली म्हणाली, “मी त्यांच्या (आई, वडील, भाऊ) घरात राहतेय. माझं कायम हे म्हणणं होतं की, मला त्यांच्यासाठी काहीतरी करायच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी करत असताना मी माझं, माझं पुढे करण्यात काही अर्थ नाहीये. मी कायम हे नवं घर बनवताना आईला कसं किचन हवंय? पप्पांना कुठला रंग हवाय? संकेतला बेडरुम कशी हवीये? याच्याकडे मी फार लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं घर करून घेतलं. कुठेही त्यांना असं वाटता कामा नये की आपलं काहीच नाहीये. पण कायदेशीर रित्या जे काही कागदपत्र आहेत तिथे जरी माझं नाव असलं तरी हे त्यांचं घर आहे.”
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून रुपाली भोसले नव्या घराच्या इंटेरिअरवर काम करत होती. घराचा प्रत्येक कानाकोपरा तिने स्वतःच्या स्टाइलनं सजवला आहे. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे रुपाली खूप आनंदात आहे. तिचं संपूर्ण आलिशान घर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसंच इतर कलाकार मंडळी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देताना दिसत आहेत.