‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत पोहोचली. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मात्र, संजना ही तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले. मधुराणी प्रभुलकर आणि मिलिंद गवळी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, सोशल मीडिया, मुलाखतीत केलेली वक्तव्ये यामुळे हे कलाकार चर्चेत असलेले दिसतात. अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे ती चर्चांचा भाग बनते. नुकतीच अभिनेत्रीने एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती, त्यावेळी तिने कलाकारांच्या पोशाखांवर ज्या कमेंट्स केल्या जातात, त्यावर वक्तव्य केले आहे.
स्टार प्रवाह वाहिनी पुरस्कार सोहळा २०२५ ची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कलाकारांनी एका वेगळ्या अंदाजात या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये हजर असलेल्या कलाकारांचे पोशाखही चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. काही मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या मालिकेनुसार थीम केल्याचे समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये दिसत आहे. उदाहरणार्थ- ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील कलाकारांनी मुंडावळ्या बांधल्याचे दिसत आहे, तर काही कलाकारांनी मॉडर्न लूक केले आहे. अभिनेत्री रुपाली भोसलेदेखील या सोहळ्याला उपस्थित आहे. यावेळी रुपाली भोसलेने कलाकारांच्या पोशाखावरून ज्या कमेंट्स केल्या जातात, त्यावर वक्तव्य केले आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “माझी प्रेक्षकांना विनंती आहे, आपण हिंदी कलाकारांना अशा सगळ्या पोशाखांमध्ये बघतो. मराठी कलाकारसुद्धा असा काहीतरी प्रयत्न करतात, तेव्हा त्यांचं कौतुक करा, त्यांना प्रोत्साहन द्या; उगाच टिप्पण्या करण्यात काही अर्थ नाही. कारण या सगळ्यामध्ये खूप मेहनत असते.”
स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा हा १६ मार्च २०२५ ला पार पडणार आहे. आता कोणता पुरस्कार कोणती मालिका व कलाकार जिंकणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या पुरस्कार सोहळ्यात धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील हजेरी लावणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. आता या सोहळ्यात काय धमाल होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान, रुपाली भोसले आता आई कुठे काय करते या मालिकेनंतर कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.