Aai Kuthe Kay Karte Fame Actress : ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसले घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत तिने संजनाची भूमिका साकारली होती. मालिका संपल्यावर रुपाली कोणत्या नव्या रुपात पुन्हा भेटीला येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘स्टार प्रवाह’च्या नव्या शोच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना रुपालीची झलक पाहायला मिळाली.
अभिनेत्री रुपाली भोसले लवकरच ‘शिट्टी वाजली रे’ या नव्या कुकिंग शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाला स्वयंपाकाची जराही आवड नव्हती मात्र, खऱ्या आयुष्यात रुपाली उत्तम स्वयंपाक बनवते. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा मंच रुपालीमध्ये दडलेली सुगरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणार आहे.
‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाविषयी सांगताना रुपाली म्हणाली, “मला स्वयंपाकाची अतिशय आवड आहे. मला जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायलाही आवडतं. मी किचनमध्ये तासनतास रमते. यामुळेच ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी लगेच होकार दिला. स्वयंपाक ही आवडीची गोष्ट असल्यामुळे हा मंच माझ्यासाठी खूप खास असणार आहे. कार्यक्रमाची टीम अतरंगी आहे. खूप कल्ला करणार आहोत आम्ही सगळे… प्रेक्षकांना पोटभरुन हसवणं हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण असेल.”
कलाकारांचं कलाकौशल्य आपण मालिका, नाटक आणि सिनेमांमधून पाहातच असतो. मात्र, त्यांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य ‘शिट्टी वाजली रे’ कार्यक्रमाच्या मंचावरून पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर येणार आहे. लोकप्रिय अभिनेता अमेय वाघ हा कार्यक्रम होस्ट करणार असून, पूर्णब्रह्म या मराठी रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे या शोमध्ये सेलिब्रिटी शेफची भूमिका पार पाडतील.
हा कार्यक्रम येत्या २६ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. या भन्नाट कार्यक्रमात निक्की तांबोळी, विजय पाटकर, आशिष पाटील, प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक, ‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर, नृत्यांगना गौतमी पाटील, पुष्कर श्रोत्री, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.