गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ अखेर संपली आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिष म्हणजेच अभिनेता सुमंत ठाकरेने भलीमोठी भावुक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता सुमंत ठाकरेने ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिषच्या भूमिकेतील फोटो आणि इतर कलाकारांबरोबर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत सुमंत ठाकरेने लिहिलं आहे, “पहिली नेहमी खास असते…काल ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. हे थोडं अस्वस्थ करणारं आहे पण हा प्रवास समृद्ध करणारा आहे. कधी कधी संधी विचित्र मार्गाने येते, तो मार्ग जितका विचित्र तितकाच ती स्वीकारल्यावरचा प्रवास सुखद, असं माझं मत आहे. मी प्रदीप दादाचा नेहमी ऋणी राहीन. नमिता वर्तक तुझं मार्गदर्शन, योग्य निर्णय घ्यायला मदत करणं, पात्र समजावून सांगणं, चूक सुधारायला लावणं, नको त्या गोष्टींसाठी उगाच रागावणं सगळ्याचसाठी खूप धन्यवाद…तुझ्यामुळे ही संधी मिळाली.”
हेही वाचा – ५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट
पुढे सुमंतने लिहिलं की, DKP सारखं प्रोडक्शन हाऊस मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. वेळोवेळी त्यांचं काम आणि कार्यपद्धत खूप काही शिकवून गेली. थँक्यू…आमचे कॅप्टन रवी सर. त्यांच्या संवेदनशील, डोळस, शांत आणि चिकित्सक दृष्टिकोनामुळे हा ‘प्रवाह’ इथवर आला आहे. मराठीरंगभूमी घडवणाऱ्या, जगवणाऱ्या दिग्गजांचे त्यांच्यावर संस्कार आहेत. नटाला समाधान देणारे क्षण सरांच्या कामात असतात. त्याची शैली हे दाखवते की त्यांची दिग्दर्शनाची ताकद काय आहे, भविष्यात त्यांच्या हातून अनेक कलाकृती घडाव्या, हीच ईच्छा. त्यांचे खंदे सहकारी, तितकेच गुणी, आपला वेगळा विचार ठामपणे मांडणारे, पडद्यामागून शांतपणे काम करणारे आणि तेवढ्याच खोडकरपणे एखाद्या शब्दाचा चोथा करणारे आयुष्यभरासाठी लाभलेले मित्र, कोटी कंपनीचे मालक तुषार आणि सुबोध दादा.
“मुग्धाचं संवादलेखन नेहमीच “वाह!” म्हणायला लावणारं होतं. तुषार, चित्रा आणि लेखन विभागाचे खूप आभार. प्रत्येक डिपार्टमेंटमधील मित्रांशी जडलेली मैत्री आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्या गुणी हरहुन्नरी हुशार सहकलाकारांनी हा प्रवास फुलवला. मधुराणीने साकारलेली आई मला कधीही विसरता येणार नाही. ईला ताईसारख्या प्रेमळ आजी जी खऱ्या आयुष्यात आणखीन जास्त प्रेम करते. मेकअप रूममध्ये क्रिकेट, नाटक, सिनेमा, इतिहास, कला अशा विषयांवर झालेल्या गप्पा नेहमी आठवतील,” असं सुमंत ठाकरेने लिहिलं आहे.
हेही वाचा – “दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो मला…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किसिंग सीनचा धक्कादायक अनुभव
“दोन वर्षे एका घरात राहून, मला स्वतःच्या जगात सामावून घेतलं, माझ्या जगात सामील होऊन माझ्या आयुष्याचा मोठा भाग बनलास ओंकार, तुझे आभार कसे मानू . अपूर्वा, तुझं वेळोवेळी मदत करणं, इतक्या आठवणी, सीन्स, त्यावर चर्चा, गाणी, आणि माझी गॉडमदर होणं, यासाठी मनापासून धन्यवाद…या प्रवासाने मला शिकवलं की एक मालिका का लोकप्रिय ठरते. ती फक्त कथा नाही तर त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रेमाने आणि मेहनतीने साकार होते. मला भेटलेली माणसं आयुष्यभर साथ देतील, हे समाधान आहे. ‘आई कुठे काय करते’ ही माझ्या पदार्पणाची मालिका आहे आणि कायम हृदयाच्या जवळ राहील. अनिश…खूप प्रेम,” अशा सुमंतच्या सुंदर पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सुमंतच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही नवी मालिका घेत आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका सुरू होणार आहे. या नव्या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.