सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण दिवाळी साजरी करताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतील सर्वच कलाकार चांगलेच चर्चेत असतात. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी कायमच चर्चेत असतात. त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मिलिंद गवळींची पोस्ट
“शुभ दीपावली
घराच्या बाहेर पडताना मास्क लावायला सुरुवात करा, फटाक्यातल्या दारूच्या धुराने प्रचंड वायू प्रदूषण होतं, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, शहरांमध्ये वायु प्रदूषण प्रचंड प्रमाणात आहे त्यात या फटाक्याच्या दारूगोळ्यामुळे फेपड्यांचे आजार होतात, जास्ती करून लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना, दीपावली , दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे, दिवे लावा कंदील लावा, वायु प्रदूषण करणारे किंवा ध्वनी प्रदूषण करणारे फटाके काय वाजवतय?मलाही लहानपणी फटाक्यांचे फार वेड होतं, इतकं की मी पाचवीत असताना माझी आई पोटाच्या आजारामुळे केईएम हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती, माझे वडील मला घेऊन केईएम ला तिला भेटायला घेऊन गेले, दिवाळीचे दिवस होते, माझी आई बेडवर झोपली होती, मी आईजवळ गेलो, आणि तिला म्हणालो की पप्पांनी मला फटाके घेऊन दिले नाहीत तू सांग त्यांना मला फटाके विकत घेऊन द्यायला, तीने वडीलांना सांगितलं की घरी जाताना त्याला फटाके घेऊन द्या.
या परिस्थितीत सुद्धा केइम हॉस्पिटल मधनं वडिलांनी मला फटाक्याच्या दुकानात नेलं आणि म्हणाले “घे तुला काय फटाके घ्यायचे ते”, मी फटाके घेतले पण नंतर मला या गोष्टीचा खूप वाईट वाटलं कि माझी आई hospital मध्ये ऍडमिट असताना मी तिच्याकडे फटाक्यासाठी हट्ट केला, आजही ते आठवलं तरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि त्रास ही होतो, तेव्हा पासून आज पर्यंत माझी फटाके वाजवायची इच्छा निघून गेली आहे,
तुमच्या आयुष्यात दिवाळीच्या काही गोड आंबट तिखट आठवणी असतीलच, चकल्या करंज्या लाडू चिवडा शेव आणि सगळ्यात कठीण पदार्थ म्हणजे अनारसे यांच्या वर्षानुवर्षाच्या आठवणी असतीलच, काहींच्या घरी अजूनही हे पदार्थ बनत असतील, खमंग वास पसरला असेल, काहीं कडे बाहेरून घरगुती पद्धतीचं फराळ मागवला असेल.
दिवाळी हा खूप छान सण आहे आपण छान पद्धतीने साजरा करूया. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”
दरम्यान अभिनेते मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.