‘आई कुठे काय करते’ ही मालिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. मिलिंद गवळींच्या आईचे निधन होऊन १४ वर्षे उलटली आहेत. त्या निमित्ताने त्यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या आईचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे कॅप्शन लिहिताना ते प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”
मिलिंद गवळींची पोस्ट
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”
आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन,
२ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता
माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम,
श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं,
असीम प्रेम , सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये , लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे , मग तो मग तो कोणीही असो , मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो,
अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा,
प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही,
असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन,
शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मी ने
मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडन मागून घ्यायची, आणि त्याला द्यावं लागायचं , त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची, संतोषी मातेचे व्रत असो ,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवरचा साईबाबा चे उपास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास,
बुधवारी माहीम चर्च ला जायचं, मदर मेरी शी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे,
माझी बहीण संगीता तिची दहावीची परीक्षा , दुसऱ्या दिवशी कुठलं तरी विषयाचा paper होता आणि घरी पाहुणे आले, आई माझ्या बहिणीला म्हणाली “अग काळजी करू नको मार्क काय तुला माझे परमेश्वर भरपूर देईल , अभ्यास सोड आणि मला स्वयंपाकात मदत करायला ये”, आणि निकाल लागला तर ती चांगल्या मार्गाने पासही झाली होती,
खरच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तिच्या परमेश्वरा मुळेच पूर्ण झालंय, नाहीतर शिक्षणाचा आणि माझा 36 चा आकडा होता. तिच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही घडत नव्हतं आणि अजून ही नाही.
ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे , आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते,
मला तर खात्रीच वाटते , की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल, तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबा च्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असे. आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल.
“मातृ देवो भव”, असे मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यामुळेच ते घराघरात पोहोचले.