‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका नेहमीच टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर असते. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतीच शेअर केलेली त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आतापर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांबद्दलचे वर्णन केले आहे. यात त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. यातील बहुतांश फोटो हे त्यांच्या भूमिकेदरम्यानचे आहेत.

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“एका जन्मात अनेक जन्म”
मला आठवतं की पृथ्वीराज कपूर म्हणाले होते की “एक अभिनेता , हा परमेश्वराच्या खूप जवळचा असतो , कारण त्याला एका आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगायला मिळतात.”

खरंच बाकीच्या क्षेत्रामध्ये एकदा मनुष्य काम करायला लागला की तो वर्षानुवर्ष तेच काम करत असतो, बँकेत काम करणारा तीस-पस्तीस वर्षे बँकेत काम करतो, जर कोणी डॉक्टर असेल तर आयुष्यभर तो डॉक्टरच असतो, माझे वडील पोलीस खात्यात होते , पोलिसांचं आयुष्य ते जगले.

पण मी अनेक वर्ष अनेक भूमिका केल्या, अनेक आयुष्य जगलो , “आई” सिनेमांमध्ये बँकर होतो, “दुर्गा म्हणत्यात मला” मध्ये डॉक्टर होतो , असंख्य वेळा पोलिसाच्या भूमिकेत पण होतो. पूर्वा एनडी स्टुडिओमध्ये “सिंहासनावर” बसलो , राजा असल्या सारखं वाटलं आणि पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण झाली की, एका कलाकाराला कुठल्या क्षणी कुठल्या कुठल्या भूमिकेत जगायला मिळेल , काहीच सांगता येत नाही.

“सूर्योदय एक नवी पहाट “या सिनेमांमध्ये एक दारू पिऊन फुटपाथ वर लोळत पडलेला मी आणि लगेचच स्वप्ना जोशीयांच्या सिरीयल मध्ये बडोद्याच्या पॅलेसमध्ये सिंहासनावर बसून भूमिका करणारा पण मीच, “अग्निपंख” मध्ये drug addict पण मीच आणि “मराठा बटालियन” मध्ये देशभक्त असणारा अमर भोसले पण मीच, आश्चर्य म्हणजे या जन्मामध्ये मला “आम्ही का तिसरे” या चित्रपटामध्ये तृतीयपंथी लक्ष्मीनारायण त्रिपाठी च्या भूमिकेत पण मी, “हक्क “ सिनेमांमध्ये नक्षलवादी पण मी, “हळद तुझी कुंकू माझं “ या चित्रपटातला “ राम “ जो अतिशय प्रामाणिक , बायकोवर प्रेम करणारा , शेतकरी पण मीच आणि “आई कुठे काय करते” मध्ये अतिशय मार्जोडा असा अनिरुद्ध देशमुख पण मीच…

या तीस वर्षातली ही लिस्ट खूप मोठी आहे, इतके जन्म जगाला मिळालेले आहेत, इथे ते मांडणं कठीण आहे, पण खरंच भाग्यवान आहे मी की मला या जन्मामध्ये किती जन्मांचा, किंवा किती वेगवेगळे आयुष्य जगायला मिळाले आहेत, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत चांगली रंजक वळणे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेते मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.