छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे लाखो चाहते आहेत. मालिकेतील अनिरुद्ध व अरुंधती या पात्राप्रमाणेच संजना या पात्रावरही प्रेक्षक खूप प्रेम करतात. संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. सतत सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आता रुग्णालयात दाखल झाली आहे.
आणखी वाचा – पुष्कर जोग पुन्हा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रवेश करणार? अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
रुपालीने रुग्णालयामधील फोटो शेअर करत ही माहिती दिली. रुपालीची छोटीशी सर्जरी करण्यात आली आहे. म्हणूनच तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील कपड्यांमध्ये फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
रुपाली म्हणाली, “आयुष्यामध्ये अप्रत्यक्षरित्या काही गोष्टी घडतात. पण अशा प्रसंगांना फक्त हसत सामोरं जाणं हाच उत्तम उपाय असू शकतो. काल माझी एक छोटी सर्जरी झाली. पण आता मी ठिक आहे. मी यामधून बरी होत आहे. तुम्ही दिलेलं प्रेम व आशिर्वाद याबाबत मी आभारी आहे. बऱ्याचदा आपण आपल्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात त्याकडे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत शारीरिक त्रास वाढत नाही तोपर्यंत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. शारीरिक त्रासाला आपण अधिक महत्त्व देत नाही.”
“पण मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते की, शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. तसेच स्वतःच्याच शरीराला गृहित धरू नका.” त्याचबरोबरीने रुपालीने डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सध्या रुपालीवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काळजी घ्या असं रुपालीला तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.