‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेबरोबरच कलाकारांनी त्यांची पात्र अगदी उत्तमरित्या साकारली होती. त्यामुळे आजही ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांना त्यांच्या पात्रांवरून ओळखलं जातं. अरुंधती, अनिरुद्ध, ईशा यांप्रमाणेच एक आवडतं पात्र म्हणजे यश अर्थात अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh).
आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत राहणारा अभिषेक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. शिवाय त्याची बायको कृतिकाही सोशल मीडियावर सक्रीय असते. दोघे अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. या फोटोवर दोघांना त्यांचा बालविवाह झाला आहे का? अशा अनेक कमेंट्स येत असतात आणि याच कमेंट्सवर अभिषेक व त्याची पत्नी कृतिका यांनी उत्तर दिलं आहे.
अभिषेक व कृतिका यांनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बालविवाह झालाय का? या प्रतिक्रियांवर उत्तर दिलं. याबद्दल बोलताना कृतिका म्हणाली की, “आम्हाला अजूनही प्रतिक्रिया येतात की, तुमचा बालविवाह झाला आहे का? तर यावर मला आता उत्तर द्यावंसं वाटतं की, आमचा बालविवाह झालेला नाही. आम्ही अगदी अधिकृतरित्या आणि योग्य वयात लग्न केलं आहे”.
यापुढे कृतिका म्हणाली की, “मी तेव्हा लहान होते. म्हणजे आत्ताच्या मुली ज्या वयात लग्न करतात त्या तुलनेत मी लवकर लग्न केलं असं आपण म्हणू शकतो. पण तरीसुद्धा मी तेव्हा २२ वर्षांची होते”. यापुढे अभिषेक असं म्हणाला की, “कृतिका तेव्हा २२ आणि मी २९ वर्षांचा होतो. कृतिका तेव्हा २२ वर्षांची होती, पण तिच्यात समंजसपणा खूप होता. आमच्या नात्यात मजामस्ती होती. लग्नानंतर खूप गोष्टी सहवासाने बदलतात याची तिला जाण होती. त्यासाठी ती तयारही होती”.
यापुढे दोघे त्यांच्या वयातील अंतराबद्दल म्हणाले की, “आम्ही आता ज्या क्षेत्रात आहोत ते म्हणजे कलाक्षेत्र. या क्षेत्रात तुमच्या वयापेक्षा तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करत आहात हे महत्त्वाचं असतं. कृतिकाने मला वय किती आहे असं काही विचारलं नव्हतं”. पुढे अभिषेकने लग्नापूर्वी वयातील अंतराबद्दल घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? याबद्दलही उत्तर दिलं.
यावर त्याने म्हटलं की, “मला माझ्या घरच्यांनी विचारलं होतं की, कृतिकाचं यावर काय मत आहे? की तू आता २९ वर्षांचा होतो आहेस आणि तुझ्यासाठी म्हणून ती लग्न करत आहे का? पण तसं काही नव्हतं. आम्ही दोघांनी आमच्या घरी सांगितलं होतं. शिवाय आम्हा दोघांनाही याबद्दल माहिती होतं की, आता या नात्यात काही वेगळं होऊ शकणार नाही. लग्न केल्यामुळे आमचा प्रवास अजून सुखकारकच होणार आहे”.