मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले आणि इतर मागास प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे उपोषणासाठी बसले आहे. त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा आंदोलक समर्थन देताना दिसत आहेत. आता मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणात एका मराठी अभिनेत्रीने सहभाग घेतला आहे. तिने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आता याबद्दल ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडेने एक पोस्ट शेअर केली आहे. याचा एक व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनात सहभागी झाल्याचेही दिसत आहे.
आणखी वाचा : “कॉलेजमध्ये केलेली मारामारी, सरांचा फोन अन्…”, ‘सैराट’ फेम अभिनेता तानाजी गालगुंडेने सांगितला ‘तो’ किस्सा
अश्विनी महांगडेची पोस्ट
“आता नाही तर कधीच नाही……..
विद्यार्थी …
स्वप्नं…
मेहनत…
परीक्षा…
उत्तिर्ण….
यश…
तरीही अपयश…
मग आक्रोश…
यातना…
मग परत परीक्षा….
मग परत सगळे तेच आधीचे पाढे…
आणि मग आत्महत्या….हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे”, अशी पोस्ट अश्विनी महांगडेने केली आहे.
आणखी वाचा : “प्राजक्ता माळीचं तिथे असणं…”, गौरव मोरेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
दरम्यान तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत समर्थन देताना दिसत आहेत. अनेकांनी या पोस्टवर ‘एक मराठा लाख मराठा’, ‘ताईसाहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.