‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर. तब्बल पाच वर्षे ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री ‘अरुंधती’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. तिच्या या भूमिकेला तसंच या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. काही महिन्यांपूर्वी या गाजलेल्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी मधुराणी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व्हि़डीओ शेअर करत असते. तसेच कामानिमित्त माहितीदेखील शेअर करत असते. अशातच मधुराणी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मधुराणी रंगभूमीवर ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ नावाचा एक अनोखा कार्यक्रम करत आहे. याबद्दलच्या अनेक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अशातच मधुराणीच्या वाढदिवशी ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग झाला आणि या प्रयोगानंतर प्रेक्षकांनी येऊन तिला मिठी मारली आणि तिचं कौतुकही केलं. यावेळी प्रेक्षकांचे प्रेम पाहून अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. या खास क्षणांचा व्हिडीओ मधुराणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल आपल्या भावुक भावनादेखील व्यक्त केल्या आहेत.

नेमकं काय म्हणाली मधुराणी प्रभुलकर?

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मधुराणीने असं लिहिलं आहे की, “हाऊसफुल्ल वाढदिवस… कृतज्ञ… निव्वळ कृतज्ञ… ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’. “शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना”. डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा”.

यापुढे मधुराणीने असं लिहिलं आहे की, “मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. हाऊसफुल्ल गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद! कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस! आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?”. दरम्यान, मधुराणीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसंच तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.