Aata Hou De Dhingana 3 : सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाने ‘स्टार प्रवाह’वर सलग दोन पर्व नुसता धिंगाणा केला आहे. आता या शोचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. तिसऱ्या पर्वातही सध्या स्टार प्रवाहवर आलेल्या नवीन मालिकांमधील कलाकारांनी हजेरी लावली. त्यानंतर आता पुढील भागात ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘आई कुठे काय करते’मधील कलाकार झळकणार आहेत. त्यांच्या अतरंगी मस्तीचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने या शोचा प्रोमो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. आता व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. तसेच त्यांना टक्कर देण्यासाठी येथे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. दोन्ही मालिकांतील कलाकारांनी या मंचावर नुसता धिंगाणा घातला आहे.
हेही वाचा : “अनेक वर्षे बाबांना काम नव्हतं…”, अनन्या पांडेने सांगितला चंकी पांडे यांच्या आयुष्यातील ‘तो’ वाईट काळ; म्हणाली, “वडील घरातच…”
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धार्थ जाधव सर्वांत आधी दोन्ही टीममधील कलाकारांना टास्कची माहिती देतो. त्याच्यासमोर एक झोपाळा ठेवलेला असतो. त्यावर झोपून टास्क खेळायचा असल्याचे तो सर्व कलाकारांना सांगतो. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे संजना या झोपाळ्यावर झोपलेली दिसत आहे. तसेच अनघा तिला झोका देत आहे. संजना झोका घेत पुढे येऊन समोर असलेल्या अनिरुद्धला काही स्टिकर चिकटवत आहे.
प्रोमोमध्ये पुढे सिद्धार्थ जाधव अनिरुद्ध आणि संजनाच्या टास्कवरून त्यांची मस्करी करताना दिसत आहे. पुढे हा खेळ ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकारांकडूनही खेळला गेला आहे. प्रोमोमध्ये या मालिकेतील कलाकारसुद्धा टास्क जिंकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. शोमधला हा भन्नाट अतरंगी टास्क शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.
हेही वाचा :‘बाहुबली’ फेम अभिनेता ४७ व्या वर्षी अडकला लग्नबंधनात, पत्नीबरोबरचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो केला शेअर
‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या भागांचे शूटिंग संपवून, यातील कलाकार ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ शोमध्ये पोहोचले आहेत. येथे सर्व कलाकारांनी भरपूर आनंद आणि मजा-मस्ती केल्याचे प्रोमोमधून समजत आहे.