‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका नेहमीच चर्चेचा विषय असते. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. त्यामुळे ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. मराठी मालिकाविश्वात ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका ठरली असून टीआरपीच्या शर्यतीतही पुढे आहे. अजूनही या मालिकेवर प्रेक्षक तितकंच भरभरून प्रेम करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट प्रेक्षकांना सुमार वाटू लागले आहेत. सतत मालिका बंद करा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे दिल्या जात आहे. सध्या या मालिकेचा महाएपिसोडचा प्रोमो ट्रोल होत आहे.
हेही वाचा – प्रवीण तरडेंच्या पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “धकाधकीच्या जीवनात…”
“भंगार मालिका आहे”, “घर आहे की विवाह संस्था”, “ही मालिका बंद करून टाका”, “असल्या मालिका लोकांनी न पाहिलेल्या बऱ्या”, “बकवास”, अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांची ‘आई कुठे काय करते’च्या महाएपिसोडच्या प्रोमोवर दिल्या जात आहेत. त्यामुळे सध्या ही मालिका चर्चेत आली आहे.
‘आई कुठे काय करते’च्या या प्रोमोमध्ये, यश आपल्या कुटुंबीयांना सांगतो की, मी आरोहीशी लग्न करणार आहे. यावर अरुंधती म्हणते, “यश तू जर ठाम असशील, तर मी तुझं आणि आरोहीचं लग्न लावून द्यायला तयार आहे.” हे ऐकून अनिरुद्ध रागात बोलतो की, अरुंधती हा निर्णय आम्हाला घेऊ दे. आता तू देशमुख नाही आहेस. यानंतर कांचन आजीसुद्धा अनिरुद्धप्रमाणे अरुंधतीला म्हणते, “आता तुला आमच्या घरातले निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. तू यात न पडलेलं बरं.” मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
एक नेटकऱ्यानं या प्रोमोवर प्रतिक्रिया देत लिहीलं, “फालतू मालिका बंद करा.. कुणाशी कुणी लग्न करतंय. तुमचे फालतू विचार लोकांना कशाला दाखवता…” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे, “असली फालतू मालिका चालू ठेवण्यापेक्षा पौराणिक ऐतिहासिक मालिका सुरू करायला हव्या आहेत. ज्यामुळे मुलांना माहिती मिळेल आणि घरातील वातावरण बिघडणार नाही. अशा मालिका पाहून घरात सूनांकडून सासूबाईंच्या अपेक्षा वाढत आहेत. घराघरात या मालिकांमुळे भांडण होत आहेत. एक मर्यादा असते मालिका दाखवण्याची… पण माझी विनंती आहे की, चॅनलने या प्रतिक्रिया बघून आतातरी शहाणपणाने असली घाणेरडी मालिका बंद करावी… या मालिकेमुळे मुलांवरती वाईट संस्कार होत आहेत.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं, “किती नाटकी दाखवतात… ज्याने कोणी ही मालिका काढली त्याचा हातात नारळ द्या.”
दरम्यान, ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यानंतर ‘आई कुठे काय करते’ बंद होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळींनी या चर्चांवर भाष्य केलं. “मालिकेचं कथानक अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत कथा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही मालिका बंद होणार नाही,” असं स्पष्टच मिलिंद गवळी म्हणाले होते.