‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay krte) या मालिकेने गेल्या पाच वर्षात प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. आजही करत आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी त्यांची एक वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उठवली आहे. अरुंधती, अनिरुद्ध, कांचन आजी, आप्पा, अभिषेक, गौरी, अनघा, यश, संजना, आरोही अशा सर्व पात्रांनी त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी स्टार प्रवाहने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निरोपाचे भाग पाहण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी शेअर केलेला एक अनुभव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
‘स्टार प्रवाह’ वाहिनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मिलिंद गवळी म्हणतात, “स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने मला काय दिलं? म्हणजेच आईने मला काय दिलं? गेली अनेक वर्षे मी मालिका, चित्रपट यामध्ये गुणी, संस्कारी नायक म्हणून पुढे आलो. मला आठवतं, मी अनिरुद्ध साकारायला सुरुवात केल्यानंतर एकदा मार्केटमध्ये गेलो होतो, तेव्हा मला एक मावशी भेटल्या. मला म्हणाल्या, “तुम्ही तेच ना, आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीचे मिस्टर, अनिरुद्ध?मी हो म्हटलं आणि त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली वाहिली.आतापर्यंत नट म्हणून माझ्यासाठी हा खूप मोठा पुरस्कार होता. आई कुठे काय करते या मालिकेने मला हा पुरस्कार दिला. आईने मला आणि उभ्या महाराष्ट्राला भरभरुन दिलं आणि हे ही शिकवलं की एका पुरुषाने कसं नसावं.”
एक मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला तिच्या कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन जगते. स्वत:चे अस्तित्व विसरते. कुटुंब हेच आयुष्य असे ती मानते. मात्र मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या तिच्या नवऱ्याला तिचे महत्व कमी वाटते. तिला व्यवहार कळत नाही, बाहेरच्या जगाचे ज्ञान नाही, त्यामुळे तिचा त्याला कमीपणा वाटतो. या सगळ्यात त्याचे ऑफिसमधील संजना नावाच्या महिलेबरोबर अफेअर असल्याचे समोर येते. यातून पुढे गोष्ट वाढत जाते. सोशिक, सहन करणारी अरुंधती आत्मसन्मानासाठी खंबीरपणे उभी राहिलेली पाहायला मिळते.
हेही वाचा: ‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.