‘आई कुठे काय करते’मध्ये अनघाची भूमिका साकारत अभिनेत्री अश्विनी महांगडे खूप लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. ती फोटो व व्हिडीओंच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मे महिन्यातच अश्विनीने आयुष्याचा जोडीदार मिळाल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता तिने तिच्या जोडीदाराबरोबरचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा – “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…”
अश्विनीच्या जोडीदाराचं नाव नीलेश जगदाळे आहे. अश्विनीने व्हिडीओ शेअर करत तिच्या मनातल्या भावना कॅप्शनमध्ये वक्त केल्या आहेत. ती लिहिते –
“प्रेम” या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार.
अनेक सुखं – दुःखं, समाधान, शांती, संकटं, परीक्षा अशा एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो.
आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे.
एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय?
खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी “नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे.
हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगेवगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते.
प्रवास हा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोप्पा होतो.
अश्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. नीलेश अश्विनीचा ड्रेस नीट करण्यास मदत करतात व पोज देतात. नीलेश फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीबरोबर मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. अश्विनीने मे महिन्यात नीलेशबरोबरच्या नात्याची माहिती चाहत्यांना दिली होती.