वसुंधरा व आकाशच्या नात्यात काही दिवसांपासून अडचणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वसुंधरा व आकाश एकत्र येणार का, असा प्रेक्षकांना प्रश्न पडल्याचे दिसत होते. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartvya Aahe) मालिकेतील आकाश व वसुंधराच्या आयुष्यात काही दिवसांपासून सतत संकटे येत असल्याचे पाहायला मिळाले. वसुंधराचा पहिला नवरा शार्दुल ऊर्फ लकी पुन्हा एकदा वसुंधराच्या आयुष्यात आला आणि त्यामुळे आकाश व तिच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसले. आता या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचे दिसत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, आकाश वसुंधराला पुन्हा त्याच्या घरी घेऊन आला आहे. आकाशबरोबर वसुंधराला पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसत आहे. आकाशची आई जयश्री त्याला विचारते, “तू कसं काय आणलंस हिला परत?” आणि वसुंधराला म्हणते, “माझ्या मुलाचं वाटोळं करायची शपथ घेतली आहेस का तू?”, असे म्हणत ती वसुंधरावर हात उगारत असते तितक्यात आकाश तिला अडवतो. आकाशचे वडील म्हणतात, “परवा, तू डिव्होर्स पेपरवर सही केलीस ना? मग हे काय मधेच?” त्यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर आकाश घटस्फोटाचे पेपर सर्वांसमोर फाडतो. त्यानंतर आकाश देवासमोर वसुंधराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो, “आपलं लग्न मोडलेलं नाहीये आणि ते कधीच मोडणार नाही.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने लिहिले, “नातं पुन्हा जोडलं जाणार, आकाश वसुंधरा एकत्र येणार…!”
काय म्हणाले नेटकरी?
पुन्हा कर्तव्य आहे मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “चला काहीतरी चांगलं दाखवत आहेत.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आकाशभाऊ संपला विषय.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप छान आकाशसर.” एका नेटकऱ्याने लिहिले, “आता भारी वाटेल.”
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, वसुंधरा व आकाश दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. आकाशच्या पत्नीचे निधन झाले आहे आणि वसुंधराचा नवरा तिला खूप त्रास द्यायचा, छळायचा. त्यामुळे तिने त्याला घटस्फोट दिला होता आणि त्याच्या आई-वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. मात्र, वसुंधराने आकाशबरोबर लग्न करताना तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच हे सत्य आकाश व त्याच्या कुटुंबासमोर आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर वसुंधराविषयी आकाशच्या मनात मोठे गैरसमजदेखील निर्माण केले गेल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
आता हा प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेत पुढे नक्की काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.