‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील प्रत्येक मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या वाहिनीवरील बहुतांश सगळ्याच मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी म्हणजेच साधारण दोन वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’वर ‘मुरांबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटील आली. यामध्ये शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुळे, सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण अशा अनेक कलाकारांची मांदियाळी आहे.
दमदार कलाकारांमुळे ‘मुरांबा’ मालिका अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ही मालिका दुपारच्या स्लॉटला प्रसारित होत असली तरी याचा टीआरपीवर जराही परिणाम झालेला नाही. आता मालिकेत अक्षय आणि रमाचं नातं नव्याने फुलताना दिसतंय परंतु, अशातच मालिकेतील एका महत्त्वाच्या पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
अभिनेत्री काजल काटेने काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून एक्झिट घेतली. तिने या मालिकेत आरतीची भूमिका साकारली होती. याआधी काजलने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत देखील काम केलं होतं. काजल काटे पाठोपाठ अभिनेत्री स्मिता शेवाळेने काही दिवसांपूर्वीच ‘मुरांबा’ मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. तिने या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारली होती. स्मिताच्या एक्झिटमुळे चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता या दोन अभिनेत्रीनंतर एका अभिनेत्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
‘मुरांबा’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच आशय कुलकर्णीने एन्ट्री घेतली होती. यामध्ये त्याने रेवाचा प्रियकर असलेल्या अथर्वची भूमिका साकारली. मालिका रंजक वळणावर असताना आता आशयने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
“थँक्यू ‘स्टार प्रवाह’ आणि ‘मुरांबा’ मालिका टीम तुमच्याबरोबर काम करून खरंच खूप छान वाटलं. जाता जाता जुने मित्र पुन्हा नव्याने भेटले. काही नवीन मित्र माझे जुनेच मित्र आहेत असं वाटलं. प्रेक्षकहो तुमचं प्रेम असंच राहो” अशी पोस्ट शेअर करत आशयने मालिकेतून निरोप घेतल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा : Video : …आणि आलिया भट्ट आता बनली लेखिका, राहा कपूरसाठी चिमुकल्यांनी आईजवळ दिले गिफ्ट्स, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, आशयच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी त्याने ‘झी मराठी’च्या ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘माझा होशील ना’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तसेच भविष्यात तो ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात झळकणार आहे.