‘शिवा'(Shiva) मालिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर व अभिनेत्री पूर्वा कौशिक हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. मालिकेत शाल्वने आशू व पूर्वाने शिवा ही भूमिका साकारली आहे. दोन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बोल्ड व बिंधास्त असणारी शिवा व थोडासा लाजणारा पण प्रेमळ असा आशू अशी ही पात्रे पाहायला मिळतात. या अनोख्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते. गेल्या काही दिवसांत शिवा-आशूच्या आयुष्यात मोठे चढ-उतार आल्याचे पाहायला मिळाले. आता शिवा व आशू एकत्र असून नोकरी न मिळाल्याने आशू भावूक झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
नोकरी मिळणं इतकं अवघड…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पाना गँगने शिवा व आशू जिथे राहतात तिथली जागा सजवली आहे. ते पाहिल्यावर शिवा म्हणते की अरे यार, हे एकदम हनिमूनसारखं वाटत आहे. त्यानंतर तिथे आशूदेखील दिसत आहे. पाना गँग त्यांना तिथे ढकलते व दरवाजा बंद करते.
पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आशूच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहताच शिवा त्याला काळजीने काय झाले हे विचारते. त्यावर आशू डोळे पुसत म्हणतो, “आज इतका दिवसभर फिरलो, खूप लोकांना भेटलो, पण नोकरी मिळणं इतकं अवघड असेल, हा अंदाजच नव्हता कधी. आपल्या दोघांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे, या सगळ्याचं तुला ओझं वाटत नाहीये ना?” आशू हताश झाल्याचे पाहताच शिवा त्याला समजावत म्हणते, “आशू, हे असं रडताना छान दिसत नाही.”
हा प्रोमो शेअर करताना, “नोकरी न मिळाल्याने हताश आशूला शिवा समजावणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे कीर्ती व दिव्यामुळे शिवा व आशू यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. मात्र, हे गैरसमज दूर झाल्यानंतर आशूने शिवाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आशूच्या आईने म्हणजेच सिताईने त्यांना शिवा सून म्हणून मान्य नसल्याचे म्हटले. तेव्हा आशूने शिवाची साथ देत त्याच्या घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आता तो शिवाच्या साथीने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आशूला कधी नोकरी मिळणार, मालिकेत पुढे कोणते ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.