एखाद्या चित्रपट, नाटक किंवा मालिकेत एकत्र काम केलेल्या सहकलाकारांमध्ये ती कलाकृती संपल्यानंतर तशीच मैत्री, बॉण्डिंग रहात असेल का, असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो. कलाकारांच्या अनेक मुलाखती, सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, पोस्ट या माध्यमातून प्रेक्षकांच्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मिळताना दिसतात. आता अभिनेता आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale)ने ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील अभिनेत्रीबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कार्तिक नव्याने…
अभिनेता आशुतोष गोखलेने शेअर केलेले फोटो दुसऱ्या-तिसऱ्या कोणाबरोबरचे नाही तर अभिनेत्री रेश्मा शिंदेबरोबरचे आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रेश्मा व आशुतोष प्रमुख भूमिकेत दिसले होते. रेश्माने दीपाची भूमिका साकारली होती तर आशुतोषने कार्तिक ही भूमिका साकारली होती. ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारलेल्या या कलाकारांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय असते. चाहत्यांकडून त्यांच्या या बॉण्डिंगचे कौतुक होताना दिसते.
आशुतोषने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक वेशभूषेत असून दोघेही सुंदर दिसत आहेत. रेश्माने निळ्या रंगाची साडी नेसली असून केसात गजरा माळल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंबरोबरच आशुतोषने लिहिलेली कॅप्शनसुद्धा लक्ष वेधून घेत आहे. आशुतोषने लिहिले, “दीपाची जानकी झाली. कार्तिक नव्याने पूर्ण व्हिलन झाला, पण केमिस्ट्री अजूनही तशीच आहे.” पुढे त्याने “काही गोष्टी कधीच बदलत नाहीत”, असे लिहित हार्ट इमोजी शेअर केली आहे.
रेश्मा व आशुतोष यांच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. मात्र, या सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची कमेंट लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी आशुतोष व रेश्मा यांच्या फोटोंवर कमेंट करीत लिहिले की, मलाही या फोटोचा भाग व्हायचे आहे लव्ह यू, असे म्हणत त्यांनी रेश्मा व आशुतोष यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. या कमेंटला प्रतिसाद देत आशुतोषने लिहिले की, तू आहेस, दुसऱ्या फोटोमध्ये लक्ष देऊन बघ. आमच्या दोघांच्या पाठीशी तूच आहेस. तर रेश्माने लिहिले की तू आमच्या हृदयात आहेस. आशुतोषने शेअर केलेल्या फोटोमध्ये हर्षदा खानविलकर अस्पष्ट दिसत आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत त्यांनी सौंदर्या ही भूमिका साकारली होती. कार्तिकची आई व रेश्माची सासू अशा भूमिकेत हर्षदा खानविलकर दिसल्या होत्या. सध्या त्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत लक्ष्मी ही भूमिका साकारताना दिसत आहेत.
हर्षदा खानविलकर यांच्यासह अनेक चाहत्यांनी या ऑनस्क्रीन जोडीचे कमेंट करीत अनेकांनी कौतुक केले आहे. “अशीच रहावी ही जोडी”, “तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र पाहून आनंद झाला”, “खूप सुंदर”, “मस्त छान”, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, रेश्मा शिंदे सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत ती जानकी या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकत आहे, तर आशुतोष ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत राकेश या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.