‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २७ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण आता अवघ्या सहा महिन्यांत ‘अबीर गुलाल’ मालिकेचा गाशा गुंडाळला जात आहे. त्यामुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. अशातच मालिकेतील लाडकी शुभ्रा म्हणजे अभिनेत्री पायल जाधवने एक पत्र लिहिलं आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पायल जाधवने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एका पत्रासह पायलने मालिकेतील कलाकारांबरोबर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या पत्राचीच सध्या चर्चा रंगली आहे. तिने पत्रात काय लिहिलं आहे? वाचा…

हेही वाचा – Video: श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, म्हणाले, “कडक…”

पायल जाधवचं पत्र

तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना,

सप्रेम नमस्कार.

पत्रास कारण की, तुमची लाडकी श्री तुमचा निरोप घेत आहे.

आपण ‘अबीर गुलाल’ मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल ‘कलर्स मराठी’चे आणि फोर लायन्स, फिल्म फार्म या निर्मिती संस्थांचे आभार. सातत्याने अथक मेहनत करून रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचे आभार.

साकारलेली प्रत्येक भूमिका ही आपल्याला काहीना काही देऊन जाते. बहुतांशी मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो. मात्र, त्या पलीकडे जाऊन श्री ने आपल्या न्यूनगंडाला थेट फाट्यावर मारायला शिकवलं. आपली माणसं जपण्यासाठी ४ पावलं मागे येणारी, प्रसंगी ठामपणे उभी राहिलेली श्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे.

मराठी मालिकांवर, कलाकृतींवर आपण भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. परत भेटूच. तोपर्यंत थांबायचं नाही, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची…”हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची बात”

हेही वाचा – Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

दरम्यान, अभिनेत्री पायल जाधवच्या पोस्टवर काही कलाकारमंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “श्री… पात्राच्या नावाप्रमाणे भूमिका निभावणारी व्यक्ती सुद्धा खूप ग्रेट काम करणारी होती. त्यामुळे श्री हे पात्र खूप लोकप्रिय झालं…श्री-अगस्त्य ही जोडी सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. नात्याची वीण किती घट्ट असावी, त्यासाठी काय खबरदारी घ्यावी, विश्वास आणि एकीच बळ असे अनेकविध संदेश देणारी ही मालिका लिखाण सुद्धा अतिशय उत्तम होतं, दिग्दर्शन आणि संपूर्ण टीम देखील खूप ग्रेट होती. साजेसं आणि खूप छान नाव ‘अबीर गुलाल’ मालिकेनं मनात घर केलं आणि ते कायम राहील सर्वांना खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.” तसंच इतर नेटकऱ्यांनी देखील पायलच्या कामाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abeer gulal fame payal jadhav write letter after serial off air softnews pps