अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘खुलता कळी खुलेना’, ‘तू तेव्हा तशी’, ‘तुला पाहता रे’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनेत्रीने मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तिक आयुष्यात अभिज्ञाने ६ जानेवारी २०२१ रोजी मैहुल पै याच्याशी लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिज्ञा-मेहुलच्या रोमँटिक फोटोंवर चाहते नेहमीच कौतुकाचा वर्षाव करतात. या जोडप्याने नुकतीच लोकमत फिल्मीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिज्ञाने नवऱ्याचं आजारपण व लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल सांगितलं.
अभिज्ञा भावेला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा झाला? याबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, “दुर्दैवाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला (Anniversary) आम्हाला मेहुलच्या कर्करोगाविषयी समजलं. तरीही मी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपण यंदा काहीतरी वेगळं करायचं जे यापूर्वी कधीही केलेलं नाही असा मी विचार केला होता. कारण, तो लग्नाचा पहिला वाढदिवस आमच्या दोघांच्या कायम लक्षात राहिला पाहिजे अशी माझी इच्छा होती.”
हेही वाचा : “वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी…”, जुई गडकरी ‘या’ गंभीर आजारांमुळे होती त्रस्त; म्हणाली, “तब्बल ८ वर्षांनी…”
अभिज्ञा पुढे म्हणाली, “आम्ही ताज हॉटेल बुक केलं. मी आणि मेहुल आम्ही दोघंही दोन दिवस ताजमध्ये राहिलो. आमच्या पूर्वजांमध्ये यापूर्वी कोणीही ताजमध्ये राहिलं नव्हतं. पण, आम्ही दोघांनी धाडस करून हा निर्णय घेतला. कारण, ती परिस्थिती फार वेगळी होती. मेहुलची सर्जरी झाली असल्याने आम्हाला कुठेही बाहेर जाता आलं नाही. अगदी आम्ही कर्जत वगैरेला सुद्धा जाऊ शकलो नाही. कारण, त्याच्या पोटाला ३५ टाके होते. खाण्या-पिण्याची अनेक बंधनं होती. त्यामुळे त्यातल्या त्यात आम्ही ताजमध्ये मजा केली.”
“आम्ही डॉक्टरांची रितसर परवानगी काढून बाहेर गेलो होतो. ताजमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा हे आधीपासून स्वप्न होतं. फक्त सर्जरी वगैरे होईल याची कल्पना नव्हती. डॉक्टरांनी देखील आम्हाला परवानगी दिली. जेवणाचं थोडंफार पथ्य होतं. पण, आम्ही दोघांनी ते मॅनेज केलं.” असं अभिज्ञाचा पती मेहुलने सांगितलं.