Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी याची ‘बिग बॉस’ने घोषणा केली. या घोषणेनंतर अनेक तर्क-वितर्क लावले गेले. एकाबाजूला काही सदस्य घराबाहेर गेल्यामुळे टीआरपी घसरल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तर दुसऱ्याबाजूला हिंदीतील ‘बिग बॉस’चं १८ पर्व येत असल्यामुळे मराठीचं पर्व ७० दिवसांत गुंडाळत असल्याची चर्चा सुरू झाली. पण ७० दिवसांचं ‘बिग बॉस’ केल्यामुळे अनेक कलाकारांसह प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. यावरच अभिजीत बिचुकलेंनी देखील आपलं परखड मत मांडलं.
शनिवारी ( २८ सप्टेंबरला ) अभिजीत बिचुकलेंनी खास पाहुणे म्हणून ‘बिग बॉस’ घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’ घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंतचं कौतुक केलं. त्यानंतर निक्कीचं देखील कौतुक करत तिने वरिष्ठ कलाकारांचा अपमान केल्यावरून सुनावलं. तसंच इन्फ्लुएन्सर म्हणण्यावरून अभिजीत बिचुकलेंनी नाव न घेता धनंजय, अंकिता यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी पंढरीनाथ बिचुकल्यांची शाळा घेताना दिसला. यानंतर घरातील दोन अभिजीतमध्ये गाण्याची जुगलबंदी रंगली. याच दरम्यान ७० दिवसांत ‘बिग बॉस’ संपवण्याबद्दल अभिजीत यांनी घरातल्या सदस्यांना टोला लगावला.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’च्या घरात दोन अभिजीतमध्ये रंगली गाण्याची जुगलबंदी; नेटकरी म्हणाले, “बिचुकले चुकून…”
अभिजीत बिचुकले काय म्हणाले?
अभिजीत म्हणाले की, “मी उघडेपणे बोलतो. वर्षा उसगांवकर आणि अभिजीत सावंत या दोन माणसांना भेटायला आलो, याचा मला आनंद होतोय. घरातील एकूणच लोकांचं जे काही वागणं, बोलणं, चालणं, घमंड, उद्धटपणा इतका टोकाला गेला की हे ‘बिग बॉस’चं घर आहे आणि महाराष्ट्राच्या परंपरेनुसार घराला घरपण म्हणून बघावं लागतं. हेच ‘बिग बॉस’च्या घरातील लोक विसरलेत, असं मला वाटतं. हे लोक स्वतःच्या वेगळ्या कोशात आहेत. यांना वाटतं आपण खूप मोठे स्टार आहोत. पण या घरामध्ये तुमचे एकदाही कुणी आभार मानले नाहीत. त्यामुळे मला वाटतंय, याच कारणांमुळे आपला ‘बिग बॉस’ ७० दिवसांवरती आला. याबद्दल जाहीर केल्यानंतर हे म्हणतायत ७० दिवस!…१७० आहेत का?…अरे १७० दिवस तुमची तोंडं कोण बघणार आहेत?…७० दिवस बघताना आमच्यात नाकेनऊ आलेत.”
हेही वाचा – Video: “…ऐ बच्च्या तुझाचं मी बाहुबली”, सुबोध भावेने सूरज चव्हाणची केली हुबेहूब नक्कल, पाहा व्हिडीओ
त्यानंतर अभिजीत बिचुकले किचनमध्ये पाणी प्यायला गेले. तेव्हा साफ नसलेलं किचन बघून म्हणतात, “किचन किती घाण आहे. आमच्या पर्वातली नेहा किती स्वच्छ ठेवायची. पहिल्याच दिवशी आम्ही भांडलो होतो. पण नेहाने माझ्यावरती कविता केली होती, असे स्पर्धक असावेत. पण हे सगळे एकमेकांबद्दल मनात मत्सर ठेऊन आहेत. अभिजीत सावंत त्यातला नाही.”