‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satvi Mulgi) या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मालिकेच्या भयावह कथनाने प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवली होती. प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेत केदारची भूमिका साकारणारा अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar)ने मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिजीत केळकर काय म्हणाला?
अभिजीत केळकरने ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या एका सीनच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर समोरासमोर दिसत आहे. अभिजीत हात जोडतो; मात्र तेवढ्यात ऐश्वर्या नारकर हसताना दिसत आहेत. त्यानंतर अभिजीतही हसायला लागतो. पुढे पाहायला मिळते की, सेटवरील सर्व जण हसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अभिजीतने ऐश्वर्या नारकर यांना टॅग करीत लिहिले, “जेव्हा एखादा खूप गंभीर सीन शूट होत असतो आणि काहीही कारण नसताना, हसू कंट्रोल न होणारे दोन कलाकार समोरासमोर येतात तेव्हा दिग्दर्शकही हार मानतात.”
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत अभिजीत केळकरची काही दिवसांपूर्वी एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. केतकीचा नवरा म्हणजेच केदार या भूमिकेतून अभिजीत केळकर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. केदारच्या मोठ्या भावाने काही वर्षांपूर्वी केदारला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतर तो त्याचा बदला घेण्यासाठी परतला असल्याचे पाहायला मिळाले होते. या सगळ्यात त्याने नेत्रा व तिच्या कुटुंबाला त्रास देण्याचादेखील प्रयत्न केला. स्वत:च्या पत्नीला केतकीला फसवले. पण, शेवटी त्याला त्याची चूक समजल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेचा शेवट कसा होणार, शतग्रीव मारला जाणार का, नेत्राचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आनंदाने राहू शकणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी या मालिकेत रूपाली, विरोचक, शतग्रीव व मैथिली अशा विविध भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आतापर्यंत त्यांना सकारात्मक भूमिकांसाठी प्रेक्षकांचे जितके प्रेम मिळत होते, तितकेच प्रेम त्यांना या मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठीही मिळताना दिसले.
दरम्यान, अभिनेता अभिजीत केळकर हा कलाकृतींबरोबरच त्याच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळेदेखील चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.