Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील स्पर्धक मोठ्या चर्चेत आहेत. काही दिवसांपासून या स्पर्धकांची मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते. या सर्व स्पर्धकांमध्ये एक व्यक्ती अशी आहे की, ज्याच्या खेळाचे सतत कौतुक होताना दिसत आहे. हा सदस्य म्हणजे अभिजीत सावंत होय. अभिजीत सावंतने एका मुलाखतीदरम्यान, त्याने गाणे शिकणे सोडले होते, असे वक्तव्य केले होते आणि ते सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत सावंतचा खुलासा

‘लोकमत फिल्मी’ला अभिजीत सावंतने मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने आपले करिअर, कुटुंब आणि इतर अनेक गोष्टींबद्दल चर्चा केल्याचे पाहायला मिळाले. गाण्याविषयी बोलताना त्याने म्हटले, “माझे काका स्टेज आर्टिस्ट आहेत. मी सात-आठ वर्षांचा असल्यापासून त्यांच्याबरोबर जायचो. मी लहानपणी त्यांना बघायचो. ते खूप सराव करायचे. तिथून माझ्या गायनाला सुरुवात झाली. मी त्यांच्याबरोबर रियाज करायचो. दहावी झाल्यानंतर मला वडिलांनी विचारले की, आता तुला पुढे काय करायचंय? त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मला गाण्यामध्येच करिअर करायचंय आणि गायक व्हायचं आहे.”

पुढे तो म्हणतो, “आर्ट्समध्ये जायचं म्हटल्यावर आई-वडील म्हणाले. त्यामध्ये काय पैसे मिळतात का? टाइमपास म्हणून करायचं असेल, तर कर. मग मी गाण्यासाठी शिक्षक शोधू लागलो. त्या दोन वर्षांत मी गझल शिकलो; पण ते शिक्षक महागडे होते. महिना हजार रुपये घ्यायचे. मला ते काही परवडायचं नाही. दोन वर्षं कशीतरी काढली. जेवढं शिकता आलं तेवढं शिकलो. अकरावी झाल्यानंतर मी विचार केला की, आई-वडिलांना भुर्दंड नको. कारण- माझी इतर फी होती आणि इकडे संगीतासाठी शिक्षकांनादेखील पैसे द्यावे लागायचे. त्यामुळे मी गाणं शिकायचं सोडलेलं. त्यानंतर माझे जे गुरुजी झाले, त्यांची ओळख काकाजींनी करून दिली. ते गुरुजी फ्रीमध्ये शिकवायचे. त्यांच्याकडे राहायचं, घरीच खायचं, ते सांगतील ते काम करायचं आणि त्यातच आपलं गाणंपण शिकायचं. असं सहा-सात वर्षं मी गाणं शिकलो आणि तिथूनच इंडियन आयडॉलचा प्रवास सरू झाला”, अशी आठवण अभिजीतने सांगितली आहे.

हेही वाचा: RHTDM : एकेकाळी ठरला फ्लॉप, आता हाऊसफुल्ल! २३ वर्षांनी प्रदर्शित झाल्यावर आर माधवनच्या चित्रपटाने कमावले तब्बल…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी चार सदस्य घराबाहेर पडले आहेत. उर्वरित १२ सदस्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकत्याच पार पडलेल्या शनिवारच्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेश देशमुखने अभिजीत सावंतच्या खेळाचे कौतुक केले. त्याबरोबरच अरबाज पटेल आणि आर्या यांचा ‘क्लास’ घेतल्याचेही पाहायला मिळाले. आता आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार? आज पुन्हा एकदा घरातील सदस्यांची समीकरणे बदलणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या सोशल मीडियावर भाऊचा धक्का या एपिसोडची चर्चा होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet sawant bigg boss marathi 5 contestant said i quit learning to sing nsp