२००० साली जागतिकीकरणाचं वारं साऱ्या देशभरात वाहू लागलं, वेगवेगळ्या मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक कारायल सुरुवात केली. वडा-पाव व मिसळपाववर ताव मारणारी मंडळी मॅकडोनाल्डच्या वातानुकूलित आऊटलेटमध्ये मोठाले ट्रे घेऊन बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाऊ लागली. मोबाइल कंपन्यांनी भारतात शिरकाव केला आणि धुमाकूळ घालायला सुरुवात केली. वेगवेगळे फॅशन ब्रॅंड्स तरुणाची आवड बनू लागले. सगळ्याच क्षेत्रात बदल घडत असताना टेलिव्हिजन विश्वात आणि खासकरून संगीत विश्वात एक नवी लाट आली ती रिमेक रीयालिटी शोजची आणि याची सुरुवात केली ती ‘इंडियन आयडॉल’पासून.
टेलिव्हिजन क्षेत्रात या शोने एक वेगळीच क्रांति घडवली अन् देशातील उत्कृष्ट गायक याच रीयालिटी शोमधून येणार अशी धारणाच यातून निर्माण झाली. अभिजीत सावंत हा पहिला ‘इंडियन आयडल’बनला. साऱ्या देशाने त्याला डोक्यावर घेतला. या गाण्याच्या रीयालिटी शोच्या फायनलची काही दृश्यं आजही काहींच्या डोळ्यासमोर तशीच आहेत. अभिजीत सावंतबरोबर अमित साना हा होतकरू तरुण व गुणी गायकसुद्धा या स्पर्धेत जिंकण्यासाठी सहभागी झाला होता आणि शेवटपर्यंत त्याने मजल मारली होती. अभिजीत सावंत जिंकला त्यावेळी बऱ्याच लोकांना हा निर्णय पटलेला नव्हता. बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवरच संशय घेतला होता.
आता नुकतंच या शोचा रनर-अप ठरलेल्या अमित सानाने पुन्हा यावर भाष्य करून हा मुद्दा चर्चेत आणला. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्याया रीपोर्टनुसार अमित सानाने हे स्पष्ट केलं की, इंडियन आयडल फिनालेच्या दोन दिवस आधी अमित सानासाठीच्या वोटिंग लाईन्स हा ब्लॉक करण्यात आल्या होत्या त्या केवळ अभिजीत सावंतच्या विजयासाठी. इतकंच नव्हे तर यामागे राजकीय प्रभाव असल्याचा आरोपही अमित सानाने केला. याबरोबरच फराह खान आपल्याकडे दुर्लक्ष करायची अन् याच शोमधील स्पर्धक राहुल वैद्यच्या गैरवर्तणूकीबद्दलही अमितने या मुलाखतीमध्ये खुलासा केला.
आता अमितच्या या आरोपांवर खुद्द अभिजीत सावंतने प्रतिक्रिया दिल्याचं स्पष्ट झालं आहे. कोणत्याही रीयालिटी शोमध्ये एखाद्याच्या जिंकण्यामागे बरीच कारणं असतात आणि केवळ अमितच्या बाबतीतच या गोष्टी घडल्या आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल अशी प्रतिक्रिया अभिजीतने दिली आहे.
‘न्यूज १८ शोशा’शी संवाद साधतांना अभिजीत म्हणाला, “अमित फारच भोळा आहे. मीसुद्धा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. जेव्हा तुम्ही त्या स्पर्धेत हरता तेव्हा त्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. अमित या शोमध्ये रनर-अप होता याचा त्याला विसर पडला आहे. त्या शोमध्ये फक्त आम्ही दोघेच उत्तम स्पर्धक नव्हतो, इतरही बरेच लोक होती जे आमच्याइतकेच गुणी होते.”
पुढे अभिजीत म्हणाला, “मला वाटतं त्याच्या लोकांनी फार वेगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या आहेत. कदाचित ते त्यांचं मत असू शकतं, त्यावेळी साऱ्या देशभरातून वोटिंग चालू होतं, त्यामुळे एकाला मतं मिळणं आणि एकाला न मिळणं असं होऊच शकत नाही. ‘इंडियन आयडॉल १’चं परीक्षण आंतरराष्ट्रीय टीमकडून होत होतं, त्यामुळे हा प्रकार त्यांच्या ध्यानात आला असता, ती मंडळी सेटवर कायम असायची.” अभिजीत सावंतच्या विजयामागे राजकीय प्रभाव असल्याचा आरोप अमित सानाने तब्बल १९ वर्षांनी केल्याने अभिजीतला ते पटलेलं नाही. “या गोष्टींवर इतक्या वर्षांनी चर्चा होतीये हे फार दुर्दैवी आहे.” असं मत अभिजीतने या मुलाखतीमध्ये मांडलं आहे.