‘इंडियन आयडॉल’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. १९ वर्षांपूर्वी या शोचे पहिले पर्व आले होते. या पर्वाच्या फिनालेमध्ये चाहत्यांना अभिजीत सावंत आणि अमित साना यांच्यादरम्यान विजेतेपदासाठी झालेली चुरशीची लढत आजही आठवते. या शोचा विजेता अभिजीत सावंत ठरला होता, तर अमित उपविजेता ठरला होता. नुकतंच अमित सानाने केलेल्या एका खळबळजनक आरोपामुळे तो पुन्हा चर्चेत आला. १९ वर्षांनंतर उपविजेता अमितने दावा केला होता की चॅनलने अभिजीत सावंतला विजयी करण्यासाठी शेवटच्या तारखेच्या दोन दिवस आधी आपल्या व्होटिंग लाईन्स ब्लॉक केल्या.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमितने अभिजीत सावंत आणि सोनी टेलिव्हिजनवर असे आरोप केले. याबरोबरच त्याने शोमधील परीक्षकांनीही त्याच्या बाबतीत दुजाभाव केल्याचा आरोप केला. हे प्रकरण चांगलंच तापलं अन् नंतर अभिजीत सावंतनेही यावर प्रतिक्रिया देत हे आरोप फेटाळून लावले. अमित फार भोळा आहे, अन् असं होणं कधीच शक्य नव्हतं असं स्पष्टीकरण अभिजीतने दिल्यानंतर पुन्हा एकदा अभिजीतने यावर उघडपणे भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : १९ वर्षांनी आरोप करणाऱ्या अमित सानाला पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतचं चोख उत्तर; म्हणाला, “तो फार…”
अभिजीतने नुकतंच सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना या प्रकरणावर पुन्हा प्रकाश टाकला आहे. अभिजीत म्हणाला, “मी फक्त या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठीच या शोवर आलोय असं अजिबात नाही. हे आरोप धादांत खोटे आहेत, अगदी खरं सांगायचं झालं त्यावेळी आम्हीही लहानच होतो. जर व्होटिंग लाईन्स ब्लॉक असत्या तर मी आणि राहुल दोघेही टॉप २ मध्ये असतो, कारण राहुल त्यावेळी सगळ्यांचाच लाडका होता. त्यानेही ‘इंडियन आयडॉल’नंतर बिग बॉससारख्या शोमधून स्वतःचं करिअर घडवलं, त्यामुळे जर खरंच लाईन्स ब्लॉक असत्या तर अमित हा फायनलपर्यंत पोहोचलाच नसता.”
पुढे अभिजीत म्हणाला, “त्या लाईन्स माझ्यासाठी ब्लॉग कराव्यात असं माझ्याकडे काय होतं? मी कोण होतो? मी त्यावेळी खरंच प्रत्येक गाण्यावर मनापासून मेहनत घेतली होती अन् फायनलपर्यंत आलो होतो. आयुष्यात आपल्याला बऱ्याच गोष्टींचा पश्चात्ताप होतो ज्याचं खापर आपण कायम दुसऱ्याच्या माथी फोडतो, अन् त्यामुळे तुम्हाला तुमचं मन हलकं झाल्यासारखं वाटतं, पण असं करणं योग्य नाही. त्या शोदरम्यान जर अमित साना हा भोळा होता तर मीदेखील त्याच्याइतकाच साधा व भोळा होता. मी काही अंबानी कुटुंबासाठी काम करत नाही त्यामुळे अशा लाईन्स ब्लॉक करणं हे कदापि शक्य नव्हतं कारण तो एक खूप मोठा शो होता, आणि जर तसं घडलं असतं तर अक्षरशः दंगली उसळल्या असत्या.”
याबरोबरच या शोमुळे मिळालेल्या लोकप्रियेबद्दल भाष्य करताना अभिजीत म्हणाला, “शो झाल्यावर पहिले माझा अल्बम आला, मग अमित सानाचा अल्बम आला अन् नंतर साजिद-वाजीद यांनी राहुलला घेऊन एक अल्बम काढला. त्यावेळी माझ्या अल्बमच्या १३ लाख कॉपीज विकल्या गेल्या व त्या दोघांच्याही अल्बमच्या जेमतेम लाखभर कॉपीजच विकल्या गेल्या. यावरून तुम्हाला लाईन्स ब्लॉक होत्या की नाही याचा अंदाज यायला हवा. जर लाईन्स ब्लॉक असत्या तर लोकांनी त्यांचे अल्बमही तितक्याच आवडीने विकत घेऊन गाणी ऐकायला हवीत ना, परंतु ही अशी काही थिओरी अस्तित्त्वातच नाही.”