गायक अभिजीत सावंत नुकताच ‘बिग बॉस मराठी ५’च्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या शोमध्ये आपल्या वागण्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस मराठी ५ पर्वात तो टॉप २ पर्यंत पोहोचत उपविजेता ठरला. बिग बॉस मराठीच्या घराबाहेरदेखील त्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. आता एका मुलाखतीत त्याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

चाहतीच्या ‘त्या’ कृतीमुळे अभिजीत सावंतचे झाले होते पत्नीबरोबर भांडण

अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, कधी कोणत्या चाहतीमुळे त्याचे त्याच्या पत्नीबरोबर भांडण झाले आहे का? यावर बोलताना तो म्हणाला की, “हो झाले आहे. एकदा महाराष्ट्रात कार्यक्रम होता, त्यावेळी शिल्पा माझ्याबरोबर प्रवास करायची. आम्ही निघत होतो. शिल्पा गाडीत बसली आणि मीसुद्धा बसत होतो. एक मुलगी आणि तिच्याबरोबर तिचे पालक होते, बहीण होती की आई होती माहीत नाही. त्या दोघीजणी आल्या; तर त्या मुलीने मला जोरात मिठी मारली. मी एकदम ब्लँक झालो, काय बोलायचं ते मला कळतच नव्हतं. त्यानंतर शिल्पा माझ्याबरोबर भांडली होती”, अशी आठवण अभिजीतने सांगितली आहे.

जेव्हा अभिजीत बिग बॉसच्या घरात होता, त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याला मोठा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरातदेखील तिने हजेरी लावली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन मुलीदेखील घरात आल्या होत्या. यावेळी या मुलींनीदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. याबरोबरच अभिजीतने अनेकदा त्याच्या पत्नीने कायम साथ दिल्याचे सांगितले आहे. इंडियन आयडलपासून ती माझ्याबरोबर आहे, असे म्हणत पत्नीचे अभिजीतने अनेकदा कौतुक केले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या आदराने…”

अभिजीत सावंतने बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे त्याला जेंटलमन अशी नवीन ओळखदेखील मिळाली आहे. तो हा शो जिंकावा असे अनेक चाहत्यांना वाटत होते, मात्र तो उपविजेता ठरला. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला आहे. आता अभिजीत सावंत नवीन कोणत्या प्रोजेक्टमधून भेटीला येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.