Bigg Boss Marathi 5 वे पर्व संपले असले तरीही या पर्वातील स्पर्धकांबाबत मोठी चर्चा सुरू आहे. बिग बॉसच्या घरात तयार झालेली, दिसत असलेली नाती शोच्या बाहेर खऱ्या आयुष्यातदेखील टिकणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता असते.
बिग बॉसच्या घरातील चर्चेत असलेल्या मैत्रीच्या अनेक जोड्यांपैकी एक म्हणजे अंकिता आणि अभिजीत यांची जोडी. त्यांच्यात मतभेद दिसून आले, अनेकदा त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता अंकिताने अभिजीतच्या काही गोष्टी मनाला लागल्या, असे वक्तव्य एका मुलाखतीतून केले आहे.
काय म्हणाली अंकिता?
अंकिता वालावलकरने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शेवटच्या आठवड्यात ज्याच्यावर तुझा सगळ्यात जास्त विश्वास होता, त्या अभिजीतने गेम बदलला. त्यावेळी तू जी भूमिका घेतलीस, ती प्रेक्षकांना आवडली होती. त्यावेळी घरात नेमकं काय घडत होतं? यावर उत्तर देताना अंकिताने म्हटले, “विश्वास म्हणशील, तर माझा त्याच्यावर विश्वास होता की नाही हे मलाच नक्की माहीत नाही. पण, त्यानं मला सांगितलं होतं की, शेवटपर्यंत मी तुझ्याबरोबर असेन. ते वाक्य जर्नी व्हिडीओमध्ये दाखवलं गेलं होतं. त्या वाक्यावर मी विश्वास ठेवला होता.”
पुढे ती म्हणते, “मैत्री करावी. आपण कोणालाही वाईट म्हणू शकत नाही. कारण- माझ्यासाठी एखादी व्यक्ती वाईट असेल, तर दुसऱ्यासाठी ती चांगली असू शकते. पण, आपण जेव्हा दोघे एका ग्रुपमध्ये आहोत. आपण दोघे पुढे जाण्याचा विचार करतोय आणि दुसरी व्यक्ती मला वाईट वाटते, तर मग आपल्यातल्या गोष्टी शेअर व्हायला नाही पाहिजेत. असं नव्हतं की, विश्वास नव्हता; पण त्याची ‘ती’ मैत्री आणि आमचं एकत्र खेळणं यांमुळे दुटप्पीपणा दिसायला लागला. खटके उडायला लागले.”
“तो आधी म्हणत होता की, सगळ्या सदस्यांना समान न्याय मिळाला पाहिजे किंवा माझ्या बोटांमुळे मला काम करता येत नाहीये. तिथेच तो स्वत:ची बोटं फ्रॅक्चर असतानादेखील दुसऱ्या आठवड्यात बाथरूमची ड्युटी स्वत: करीत होता. तू सदस्यांना समान न्याय देत नाहीस, असं माझं म्हणणं होतं, ते मी मांडलं. पण, त्यानं ते वेगळ्या दृष्टिकोनातून घेतलं. तो मला म्हटला की, अरे, तू निक्कीबरोबर भांडतच नाहीये. पण, जर मला प्रश्न तुझ्याशी आहे, तर मी निक्कीबरोबर का भांडू? हे मला त्याला सांगायचं होतं; पण कदाचित त्याला शेवटपर्यंत ते समजलं नाही. ते तसंच राहिलं.”
अभिजीतने अंकिताबरोबर मैत्री होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. तर हाच प्रश्न तुला आहे, की तुझ्याकडून अभिजीतबरोबर मैत्री असेल का? यावर बोलताना अंकिताने म्हटले, “तसं बघायला गेलं, तर आमचं क्षेत्र वेगळं आहे. त्याच्या काही गोष्टी मला मनाला लागल्या. जसं त्यानं एका टास्कमध्ये म्हटलं की, मला तुला द्यायचंच नव्हतं. मी हे जान्हवीला दिलं असतं, नाइलाजानं तुला दिलं. ही गोष्ट मला खूप लागली. कुचकीसुद्धा बोलला. त्यावर तो म्हणाला की, बिचुकले बोलून गेला ना कुचकी. आता बिचुकलेंच्या बोलण्यावरून तू मला कुचकी का म्हणतोयस, असं मला वाटलेलं. तर या गोष्टी मनाला लागल्या होत्या आणि जेव्हा मला गोष्टी लागतात, तेव्हा मी स्वत: वेळ घेते.”
पुढे अंकिताने म्हटले, “जेव्हा मी बाहेरच्या जगात सेटल होईल तेव्हा मी त्याच्याशी संपर्क साधेन. त्याच्या बाजूने मैत्री नसेल तरी मी माझ्या बाजूनं एकदा नक्की प्रयत्न करीन. माफी मागण्यासारखं मी काही केलंय, असं मला वाटत नाही.”
दरम्यान, अंकिता वालावलकर सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध आहे. आता तिची पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.