कोणतेही चित्रपट, मालिका, नाटक जेव्हा हिट होते, तेव्हा ते लोकांना आवडते. त्यावेळी समोर दिसणाऱ्या कलाकारांचे योगदान तर असतेच; मात्र त्याबरोबरच दिग्दर्शनसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. या सगळ्यात कलाकृतींना यशस्थानावर नेण्यासाठी त्याचे कथानकदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कलाकार, दिग्दर्शक आणि इतर सर्व बाबींबरोबरच लेखकाचेदेखील तितकेच महत्त्व असते. आता अभिनेता व लेखक अभिजीत गुरूने एका मुलाखतीत लेखकांना कमी मान दिला जातो, असे म्हटले आहे.
काय म्हणाला अभिजीत गुरू?
अभिजीत गुरूने नुकतीच ‘सेलिब्रिटी कट्टा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, लेखकांमुळे मालिका घडतात आणि रोज लोक टीव्हीसमोर खिळून बसतात. असं कुठे होतंय का की, लेखकांना कमी मान दिला जातो, अवॉर्डसना बोलावलं जात नाही. याबरोबरच त्यांचं मानधनदेखील कमी आहे. लेखकांना कमी मान दिला जातो का, या प्रश्नाचे उत्तर देताना अभिजीत गुरूने म्हटले, “मला असं वाटतं की, सगळीकडेच लेखकांना कमी मान दिला जातो. कारण- ते कुठेतरी पडद्याआड असतात. मी मधे सलीम जावेद यांची डॉक्युमेंट्री बघितली. त्यामध्ये त्यांनीसुद्धा त्या काळी काय केलं होतं? तर त्या काळी पोस्टरवर लेखकांची नावं येतं नव्हती. मग त्यांनी स्वत: जाऊन पोस्टरवर स्वत:ची नावं छापली. रात्रीच्या रात्री त्यांनी पेंटर बोलावून जंजीरच्या पोस्टरवर स्वत:चं नाव लिहून घेतलं. हे पाऊल उचलणं त्यांना भाग पडलं. का बरं? जर तुम्ही उलट हिशेब केला, तर सगळ्यात शेवटी प्रिंट बनते. प्रिंट बनण्यापासून जर आपण मागे मागे आलो, तर सगळ्यात आधी कोरं पान असतं. त्या कोऱ्या पानावर काही अक्षरं आल्याशिवाय तुमची कलाकृती सुरूच होऊ शकत नाही. मग जे उगमस्थान आहे, त्या व्यक्तीला तुम्ही तेवढा मान का देत नाही? त्यांची पोस्टरवर नावंच नसतात. लोक त्यांना ओळखत नसतात. त्यांना पुढे आणलं जात नाही. मालिका, सिनेमा यामध्ये जर वाटलं की, हे बरोबर होत नाहीये; तर कलाकारांना बदलत नाहीत, लेखकांना पहिल्यांदा बदलतात.”
आपले म्हणणे अधिक स्पष्ट करताना गुरू म्हणाले, “मानधनाच्या बाबतीतसुद्धा अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या तुलनेत लेखकांना कमी मानधन मिळतं. आपण इतके पुरस्कार सोहळे बघतो, त्यामध्ये किती लेखक येऊन पुरस्कार देतात. किती लेखकांची ओळख करून दिली जाते? कोणाचीच नाही. पाश्चिमात्य देशात लेखकांना खूप मान आहे आणि त्यांना योग्य प्रकारे वागणूक दिली जाते. आपल्याकडे जवळजवळ सगळेच लेखक तुम्हाला सांगतील की, बऱ्याच लेखकांची कोणाला माहितीसुद्धा नाही. ही मालिका कोण लिहितं ते माहीत नसतं. लोकांसमोर लेखकांना आणलंच जात नाही, तर ते त्यांना कसे माहीत होणार? मला असं वाटतं की, थोडंसं वागणुकीच्या बाबतीत लेखकांना बाजूला ठेवण्यात येतं. हा सिस्टीमचा भाग झाला आहे; जो ब्रेक व्हायला हवा.”
हेही वाचा: ‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
लेखक मित्रमंडळीमध्ये अशी चर्चा होत नाही का की, याच्याबद्दल कधी अॅक्शन घेतली पाहिजे. कमीत कमी कोणाशी तरी बोललं पाहिजे? त्यावर उत्तर देताना अभिजीतने म्हटले, “असं एकदा आम्ही केलंही होतं. सगळ्यांनी मिळून एक संस्था सुरू केली होती. मानाची संस्था म्हणजेच मालिका, चित्रपट, नाटक असं मिळून ती संस्था होती. मुळात एसडब्ल्यूसुद्धा आहे, रायर्टर्स असोसिएशनसुद्धा आहे. पण काय आहे ना, जिथे माणूस हा भाग येतो, तिथे असुरक्षिततासुद्धा येते. माझ्यासाठी तू लढ, असं जेव्हा येतं, तेव्हा ती व्यक्ती विचार करते की, याचं काम तर जाईलच; पण उद्या मलाच काम दिलं नाही तर? कुठेतरी त्या माणसाच्या मनात भीती येते आणि तो दोन पावले मागे जातो. हे सगळीकडे होतं. हे फक्त लेखकांच्या बाबतीत होतं असं नाही, हे जगातील कुठलंही क्षेत्र असू द्या, कोणीही कोणाच्या बाजूनं उभं राहताना १० वेळा विचार करतो की, याचा प्रभाव माझ्या करिअरवर काय पडेल? त्या लोकांचंसुद्धा चुकत नाही. सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी काहीतरी मोठी घटना व्हायला पाहिजे. लोकांनी आता थोडं थोडं बोलायला सुरुवात केलेली आहे. पण, ते एकदम सिस्टीममधून जाणं इतकं सोपं नाहीये.
दरम्यान, अभिजीत गुरू हा लेखक असण्याबरोबरच अभिनेतादेखील आहे.