Abhijt Bichukale in Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आज दोन पाहुणे येणार आहेत. हे दोन्ही पाहुणे आधीच्या पर्वातील स्पर्धक आहेत. एक म्हणजे राखी सावंत आणि दुसरा अभिजीत बिचुकले. राखीच्या एंट्रीचा प्रोमो खूपच चर्चेत आहे, अशातच आता कलर्स मराठीने अभिजीत बिचुकलेच्या एंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
बिग बॉसच्या घरात आल्यावर अभिजीतने सूरजची बाजू घेऊन अंकिता वालावलकरला काही गोष्टी सुनावल्या. ‘बिग बॉस’ने नुकताच घरातील सदस्यांना एकमेकांना टार्गेट करण्याचा टास्क दिला होता. त्यामध्ये घरात ठामपणे आपलं मत न मांडणाऱ्या दोन सदस्यांची नावं घ्यायची होती. यावेळी अंकिताने सूरजचं नाव घेतलं होतं. याचाच उल्लेख करत अभिजीतने अंकिताला काय म्हटलं, ते जाणून घेऊयात.
‘मैं हू डॉन’ या गाण्यावर अभिजीत बिचुकले एंट्री करतो. डॉ. अभिजीत बिचुकले का सादर नमस्कार, असा डायलॉग तो मारतो. यावर घरातील सदस्य हसताना दाखवले आहेत. नंतर घरात तो अंकिताला म्हणतो, “ते लाल फुली जेव्हा मारली तेव्हा तू सूरजला म्हटलीस… पण बहीण असं कधीच करत नाही. तुमचा कुचकेपणा दिसला.” त्यानंतर तो म्हणतो की “मला इतका राग येतोय, मी या घरात काहीही फोडू शकतो.” बिचुकलेला राग नेमका कशामुळे आला ते प्रोमोमध्ये स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आजच्या भागात घरात काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. ‘बिग बॉस प्रेक्षकांचं म्हणणं इतकं पण मनावर घ्यायचं नव्हतं, राखी आणि बिचुकले दोघांना बरोबर पाठवलं,’ ‘अंकिताला बरोबर बोलले,’ ‘डॉ. अभिजीत बिचुकलेंनी बरोबर अंकिताला ओळखले..’, ‘आज तर बिग बॉसने खुश करून टाकलं,’ ‘सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आज’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘घरातले सारेच दचकले – जेव्हा आले डॉ. बिचुकले’, अशी कमेंट उत्कर्ष शिंदेने या प्रोमोवर केली आहे.