अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये व्यग्र आहेत. ‘केबीसी’च्या १४ व्या पर्वामध्ये ते संचालक म्हणून काम करत आहेत. आज त्यांचा ८० वा वाढदिवस आहे. हे निमित्त साधन अभिषेक बच्चनने त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले. त्यासाठी तो आणि जया बच्चन या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवर पोहोचले. दरम्यान या भागाचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. ‘केबीसी’चा हा खास भाग आज सोनी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
वडिलांना खास सरप्राईज देण्यासाठी अभिषेकने खूप मेहनत घेतली. या संपूर्ण प्रक्रियेचा संक्षिप्त व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तो केबीसीच्या सेटवर या विशेष भागासाठी तयारी करत असताना दिसत आहे. त्यात कार्यक्रमाच्या टीमसह नियोजन करण्यापासून ते स्वत:चे संवाद पाठ करण्यापर्यंत सर्वकाही करताना होणारी त्याची धावपळ दिसून आली. मंचावर गेल्यानंतर बच्चन पिता-पुत्रांनी मारलेली मिठी हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात राहते. या भागात जया बच्चनही उपस्थित होत्या. व्हिडीओमध्ये त्या अमिताभ यांना गोड पदार्थ भरवताना दिसल्या. स्पर्धक, पत्नी आणि मुलगा यांच्यासह अमिताभ यांनी वाढदिवस साजरा केला.
या पोस्टखाली त्याने “हे सरप्राईज देण्यासाठी खूप गुप्तता, खूप नियोजन, खूप मेहनत आणि बरीचशी तालीम करावी लागली. पण त्यांच्या आनंदापुढे हे केल्याचा मला आनंद आहे. त्यांना काम फार प्रिय आहे. या आवडत्या ठिकाणी जाऊन त्यांना सरप्राईज देत त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा करताना मी फार भावनिक झालो होतो.” असे म्हटले आहे. त्याने केबीसीच्या टीम आणि सोनी वाहिनी यांचे आभारही मानले.
आणखी वाचा – ‘फोन भूत’मध्ये बायको कतरिनाच्या भूमिकेवर विकीची गोड प्रतिक्रिया; म्हणाला, “माझी…”
या भागामध्ये ऑर्केस्ट्रावर अमिताभ यांच्या सुपरहिट चित्रपटातील गाणी वाजवण्यात आली. मिळालेल्या सरप्राईज गिफ्टवर ते खूप भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्याकडे शब्द नाहीयेत. पण एवढंच म्हणेन की आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही.”