Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Mehendi : सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच अभिनेत्री रेश्मा शिंदेचं केळवण पार पडलं. तर, ‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व सुद्धा पुढच्या महिन्याच बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्याच्या घरी सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात झाली आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अभिषेक गावकरचा मेहंदी सोहळा नुकताच पार पडला आहे. याचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेकने नव्या प्रवासाला सुरुवात करत साखरपुडा केला होता. त्याची होणारी पत्नी सोनाली गुरव ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व रील स्टार म्हणून घराघरांत लोकप्रिय आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र बरेच व्हायरल झाले होते. यानंतर ही जोडी लग्न केव्हा करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांच्या लाडक्या श्रीनूने ( मालिकेतील नाव ) तो लवकरच लग्न करेल असं सांगितलं होतं. आता त्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
‘सारं काही तिच्यासाठी’ या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेमुळे अभिनेता ( Abhishek Gaonkar ) सर्वत्र चर्चेत आला. यामध्ये अभिषेक गावकरने ‘श्रीनू’ ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, तरीही त्याच्या सगळ्या चाहत्यांना अभिषेकच्या लग्नाबद्दल उत्सुकता आहे.
सोनाली आणि अभिषेकच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. यामध्ये सोनालीने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस, फुलांचे दागिने असा लूक केला होता. तिच्या हातावर सुंदर अशी मेहंदी रेखाटल्याचं पाहायला मिळत आहे. तर, अभिषेकने सोनालीला कॉन्ट्रास असा मोरपिशी रंगाचा सदरा घातल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिषेक गावकरची होणारी बायको आहे तरी कोण?
अभिषेक गावकरची होणारी बायको सोनाली गुरव ही सोशल मीडियावर विविध मजेशीर रील्स व्हिडीओ बनवत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या रील्सला मिलियनच्या घरात व्ह्यूज असतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकत्र होते. आता लवकरच अभिषेक ( Abhishek Gaonkar ) आणि सोनाली लग्नबंधनात अडकणार आहेत.