मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराई सुरू आहे. २०२४ च्या शेवटच्या महिन्यांत आणि २०२५ च्या सुरुवातीला अनेक कलाकारांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. आता या कलाकारांच्या लग्नानंतरचे सुंदर फोटो आणि लग्नातील काही आठवणींचे व्हिडीओ समोर येत आहेत. ‘सारं काही तिच्यासाठी’फेम अभिनेता अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी विवाह पार पडला. आता या दोघांनी त्यांच्या लग्नातील आठवणींचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये अभिषेकने सोनालीबद्दल त्याच्या घरी कसं सांगितलं याचा सुंदर किस्साही सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनाली गुरव आणि अभिषेक गावकर या दोघांच्या लग्नाला आता जवळपास तीन महिने झाले आहेत. अशात या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील सुंदर आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी एकमेकांची निवड कशी केली याचे सुंदर किस्से सांगितले आहेत. तसेच दोघांच्या कुटुंबीयांनीही या दोघांच्या नात्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक गावकरने सोनाली त्याला आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे हे घरी कसं सांगितलं याचा किस्सा सांगितला आहे.

अभिषेक गावकर म्हणाला, “मी सोनालीला दोन तीन वेळा घरी घेऊन आलो होतो. तर एकदा बाबांनी मला मुद्दाम विचारलं की, तू लग्न कधी करणार आहेस? मी त्यांना सांगतो सांगतो म्हणालो. त्यावर ते म्हणाले की, तसं नाही ते मंगळसूत्राचं माप द्यावं लागेल, त्यामुळे मी विचारतोय. त्यावर मी बाबांना सोनालीकडे हात दाखवत म्हणालो की, घ्या हिचं माप. त्यानंतर सर्वांना कळलं की, आम्हा दोघांना एकमेकांशी लग्न करायचं आहे.”

सोनाली आणि अभिषेक दोघांच्या कुटुंबीयांनी, त्यांची जोडी किती परफेक्ट आहे, तसेच त्यांना आपल्या मुलांबद्दल काय वाटतं याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक मुलीच्या पालकांना मुलगी सासरी जाताना वाईट वाटतं आणि रडू येतं. अशात सोनालीच्या आई-बाबांनी या संदर्भात बोलताना म्हटलं, “आनंद या गोष्टीचा आहे की, ती तिच्या आयुष्यात सुखी आहे आणि एक चांगली व्यक्ती तिला मिळाल्यानं आम्ही आनंदी आहोत.”

प्रत्येक जोडप्यामध्ये वाद आणि भांडणं होत असतात. त्यामुळे व्हिडीओमध्ये सोनालीनं तिच्या आणि अभिषेकच्या भांडणांवर बोलताना म्हटलं, “मला त्याचा खूप राग येतो. मी विचार करते की, मी या माणसाशी का लग्न करू? याचं एकही कारण नाही. मग मी त्याचा चेहरा बघते आणि पुन्हा म्हणते नाही यार, कसाही असला तरी तो माझा आहे आणि मला आता त्याला सांभाळून घ्यायचं आहे. त्याला माणसं कळतात आणि तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्यामुळे मी त्याच्यात अडकलीये.”