मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यांत अभिनयाव्यतिरिक्त नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, निरंजन कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, महेश मांजरेकर, प्रार्थना बेहेरे, अनघा अतुल अशा अनेक कलाकारांनी हॉटेल, कपडे व साड्यांच्या व्यवसायात आपला जम बसवला आहे. आता टेलिव्हिजन विश्वातील आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘अबोली’ मालिकेच्या माध्यमातून गौरी कुलकर्णीला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. गेल्या वर्षीच्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात तिला सन्मानित देखील करण्यात आलं होतं. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता गौरीने घरातील परंपरागत व्यवसाय जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिने माहिती आहे.
हेही वाचा : भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे भावुक, पत्नीलाही अश्रू अनावर; आठवला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाला, “माझा नवीन जन्म…”
गौरी कुलकर्णी ही मूळची अहमदनगरची आहे. तिच्या कुटुंबीयांचा परंपरागत संगीत वाद्य बनवून पुढे ही वाद्यं बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आरं.बी. कुलकर्णी हे त्यांचं संगीत वाद्यांचं दुकान गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगरमध्ये आहे. परंतु, काळानुसार बदल करून आता गौरीने संगीतप्रेमींसाठी एक नवीन म्युझिकल मॉल सुरू केला आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दिली. यामध्ये पारंपरिक वाद्यांच्या दुकानाला पूर्णपणे आधुनिक टच दिल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : भरत जाधव यांची सरप्राईज एन्ट्री! ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत साकारली महत्त्वाची भूमिका
गौरी कुलकर्णीची पोस्ट
सस्नेह नमस्कार…
नगरच्या ‘संगीतवाद्य’ क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मे. आर. बी. कुलकर्णी हार्मोनियम मेकर्स अँड तबला मर्चंट या दालनाच्या विस्तारित नवीन वास्तूमध्ये संगीत क्षेत्रातील सर्व संगीत साधकांना वाद्य एका छताखाली उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. तो उपलब्ध करून देताना अगदी प्रशस्त जागेत, सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मॉल संस्कृतीमध्ये आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
दरम्यान, गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सचित पाटील, सुयश टिळक या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.