अभिनेता आमिर अली व संजीदा शेख यांचा ४ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडण्याबद्दल आमिरने वक्तव्य केलं आहे. आमिर आणि संजीदाचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. ८ वर्षांनी ते दोघे २०२० मध्ये विभक्त झाले आणि २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या जोडप्याला एक मुलगी असून ती संजिदाबरोबर राहते. आमिर हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळतो. पण एका मुलाखतीत तो घटस्फोटाबद्दल व्यक्त झाला. तसेच पाच महिन्यांपासून एका रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने सांगितलं.
घटस्फोटाचा आमिरवर परिणाम झाला आणि आयुष्यातील गुंतागुंत वाढली. त्याला सगळं स्वीकारून आयुष्यात पुढे जाण्यास वेळ लागला, असं त्याने नमूद केलं. तसेच त्याच्याबरोबर काय घडत आहे, हे त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी कोणीही समजू शकत नव्हतं. पण घटस्फोट आता त्याचा भूतकाळ आहे. आता त्यातून बाहेर पडून एक चांगल्या स्थितीत असल्याचं आमिरने सांगितलं. आमिर आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी संजीदाला एक मुलगी आहे, तिचं नाव आयरा आहे. तिचा जन्म २०१८ मध्ये झाला. लेक आयराच्या संपर्कात नसल्याचा खुलासा मुलाखतीत आमिरने केला.
आमिरने दिली प्रेमाची कबुली
आमिर म्हणाला की त्याने सार्वजनिकपणे त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबद्दल काहीही बोलणं टाळलं आहे. पण लोक त्यांच्या घटस्फोटाबद्दल अंदाज बांधत आहेत आणि त्यांना वाटेल ते लिहित व बोलत आहेत, यावर तो दुर्दैवाने नियंत्रण ठेवू शकलेला नाही. आमिर पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याने खुलासा केला की तो आता जवळजवळ ५ महिन्यांपासून नवीन रिलेशनशिपमध्ये आहे. आमिर त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल म्हणाला की तो खूप दिवसांनी कोणातरीबरोबर आहे. तो आधीच्या नात्यातून बाहेर पडून नवा सुरुवात करतोय आणि या टप्प्याचा आनंद घेत आहे. दरम्यान, आमिर अंकिता कुक्रेतीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तो नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत दिसल्यानंतर त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं.
आमिर म्हणाला की घटस्फोटानंतर प्रेमावर विश्वास उडाला नव्हता, पण तो स्वतःशीच संघर्ष करत होता. गेल्या वर्षी तो खूप लोकांना भेटला होता, पण नातं थोडं पुढे सरकलं की तो माघार घ्यायचा. आता तो जिला डेट करतोय, तिच्या प्रेमात फक्त एका आठवडाभरातच पडला, असंही त्याने सांगितलं.
आमिर अली सध्या कामासाठी चांगल्या संधी शोधत आहे. आपल्याला हव्या तशा प्रकारच्या भूमिका मिळत नसल्याचं त्याने सांगितलं. २०२४ मध्ये, आमिर अलीने ‘लुटेरे’ आणि ‘डॉक्टर्स’ या दोन वेब सीरिजमध्ये काम केलं होतं.