‘झी मराठी’ वाहिनीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘पारू’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच सुरू होणार आहेत. शिवाय ‘ड्रामा Juniors’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या शोसाठी ऑडिशन सुरू आहेत. त्यामुळे ‘झी मराठी’च्या काही जुन्या मालिका बंद होत आहेत, तर काही मालिकांच्या वेळा बदलल्या जात आहेत. आता लवकरच ‘तू चाल पुढं’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर सेटवरचा शेवटचा दिवस चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसत आहेत. काही तासांपूर्वी मालिकेतील श्रेयस म्हणजेच अभिनेता आदित्य वैद्यने सेटवरचा शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑगस्ट २०२२मध्ये ‘तू चाल पुढं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. दीपा परब-चौधरी, आदित्य वैद्य, धनश्री काडगांवकर, प्रतिभा गोरेगावकर, देवेंद्र दोडके अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी, श्रेयस, शिल्पी, मयुरी अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोहोचली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. १३ जानेवारीला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या ‘तू चाल पुढं’ मालिकेचे प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत, भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर शाहरुख खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, “आता तर मी निषेध…” 

अभिनेता आदित्य वैद्यने “‘तू चालं पुढं’चा शेवटचा दिवस” असं लिहित एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता सेटला शेवटचा नमस्कार करताना दिसत आहे. आदित्यबरोबर बबनपांड्या म्हणजे अभिनेता गणेश सरकटे पाहायला मिळत आहेत. गणेश खूप भावुक झाला असून आदित्यला मिठी मारून ढसाढसा रडताना दिसत आहे. “चला निरोप घेतो…”, असं म्हणत आदित्य सेटला नमस्कार करून निरोप घेत आहे.

हेही वाचा – Video: पजामा पार्टीत नुपूर शिखरेचा मित्रांसह लुंगी डान्स, व्हिडीओ व्हायरल

आदित्यच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीनं लिहिल आहे, “या मालिकेची खूप आठवण येईल. ‘तू चाल पुढं’ ही मालिका नसून आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग होती. वास्तविक कौटुंबिक मूल्यांचे सर्व पैलू असलेली मालिका घेऊन आल्याबद्दल ‘झी मराठी’चे आभार. तुला आणि ‘तू चाल पुढं’च्या सर्व सहकलाकारांना व टीमला माझ्या शुभेच्छा. तुमची आठवण येईल”, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, याआधी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ व ‘३६ गुणी जोडी’ या मालिका ऑफ एअर झाल्या. टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने या दोन मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aditya vaidya share last day of tu chaal pudha serial set pps