काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. या धक्कादायक निर्णयानं अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी ‘राजीनामा देऊ नका’, अशी आग्रही मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची बरीच चर्चा रंगली. आता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणाकडे असावं, असं त्यांना वाटतं याचा खुलासा केला आहे.
‘झी मराठी’वर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरू झाला. आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये अनेक राजकारणी, नेतेमंडळी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते राजकारण आणि अभिनय क्षेत्र याबद्दल भरभरून बोलताना दिसणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक अवधूत गुप्ते याने अमोल कोल्हे यांना राजकारणाबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांची अमोल कोल्हे यांनी बेधडकपणे उत्तरं दिली. यावेळी अवधूत गुप्ते याने “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असले पाहिजे? अजित पवार की सुप्रिया सुळे?” असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवार साहेब.”
अमोल कोल्हे यांनी दिलेलं हे उत्तर आता खूप चर्चेत आलं आहे. अमोल कोल्हे यांनी दिलेलं हे उत्तर ऐकल्यावर आता या आगामी भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर सोशल मीडियावरून प्रेक्षक या आगामी भागासाठी आतुर असल्याचं सांगत आहेत.