खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. अभिनेता म्हणून आतापर्यंत त्यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि त्यांचं भरभरून कौतुकही झालं. आता ते लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचं तिसरं पर्व काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे, नारायण राणे, श्रेयस तळपदे अशा विविध मान्यवरांनी हजेरी लावली. तर पुढील आठवड्यात या कार्यक्रमात डॉ. अमोल कोल्हे हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्त ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेऊन मनोरंजन सृष्टीत काम करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला.

आणखी वाचा : ‘वडापावच कोणेकाळी आधार होता…’ अभिनेते अमोल कोल्हेंनी जागवल्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणी

ते म्हणाले, “मी एमबीबीएसचं शिक्षण घेत असतानाच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता. असे खूप कमी जण असतात ज्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायला मिळतं. आवड जोपासणारे अनेक असतात पण आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळतं तेव्हा तो सगळा सुखकर प्रवास सुरू होतो आणि एमबीबीएस करत असतानाच ही जाणीव मला प्रकर्षाने झाली की आपल्याला अभिनय क्षेत्रात जायचं आहे.”

हेही वाचा : … म्हणून प्राजक्ता गायकवाडने अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यातून घेतली एक्झिट, कारण आलं समोर

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या या पर्वातील आधीचे भाग खूप गाजले. तर आता अमोल कोल्हे या कार्यक्रमात सहभागी होणार असून ते कोणत्या विषयांवर बोलणार आणि हा भाग किती रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Story img Loader